धाराशिव (प्रतिनिधी)- कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत दरवर्षी प्रमाणे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती मेळावा पुष्पक मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. या मेळाव्याची  संकल्पना मंत्री ना. मंगल प्रभात लोढा यांची आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण  संस्था धाराशिव व कळंब, जिल्हा कौशल्य विकास केंद्र धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 24 जून 2024 रोजी हे शिबिर व पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला.

या छत्रपती शाहू महाराज  युवा शक्ती करिअर मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राणाजगजितसिंह हे ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते. त्यांनी यावेळी सर्व विद्यार्थ्यांना संबोधित केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रवीण औताडे, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास संजय गुरव, आयटीआय धाराशिव चे प्राचार्य मारुती बिरादार व जिल्ह्यातील सर्व आयटिआयचे प्राचार्य उपस्थित होते.

याप्रसंगी माजी मंत्री व तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन मार्गदर्शन केले. प्रत्येकाने कौशल्य प्रशिक्षण घ्यावे. त्यातून नोकरी व स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. नवीन एमआयडीसी च्या माध्यमातून अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे. अनेक स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. देशाला प्रगती करायची असेल तर मुलींना मोठ्या प्रमाणात शिक्षण देण्याची गरज आहे. मुलींच्या उल्लेखनीय सहभागाबद्दल खुप आनंद वाटला. आपल्या जिल्ह्याची आकांशायुक्त जिल्हा हि ओळख पुसून टाकायची आहे. त्यासाठी जिल्ह्यातील आयटिआय आणि कौशल्य विकास संस्थांना यासाठी मदत करणार आहे.

देशाचे पंतप्रधान यांचे विकसित भारताचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कौशल्य विकास व स्किल इंडियातुन  मदत होणार आहे. अनेक योजनामधुन 2000 कुटुंबांना स्वयं रोजगार व उद्योजकता यासाठी 100 कोटी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. यापुढेही युवकांना मोठ्या प्रमाणावर मदत करणार आहे. या कार्यक्रमासाठी यशस्वी करण्यासाठी सर्व शिल्प निदेशक, शिल्प निदेशिका, सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेहनती साठी लोकप्रतिनिधी या नात्याने विशेष आभार प्रकट केले.

या कार्यक्रमासाठी 2000 पेक्ष्या जास्त युवक व युवतींनी सहभाग नोंदवला. या मेळाव्यामध्ये रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जवळपास 14 कंपन्यांनी सहभाग नोंदवला यात 992 उमेदवारांची उपस्थिती होती तसेच 505 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. तसेच या मेळाव्यामध्ये स्वयंरोजगाराची व कौशल्य विकासाची माहिती देण्यासाठी शासनाचे विविध आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यासाठी 13 स्टॉल लावण्यात आले होते. यात 618 उमेदवारांनी स्वयंरोजगाराच्या स्टॉलचा लाभ घेतला.

 
Top