कळंब (प्रतिनिधी)- नीट  परिक्षेबाबत दररोज नव नवीन खुलासे समोर येत आहेत. विविध माध्यमा मार्फत नीटच्या कथीत घोटाळ्याचा भांडाफोड केला जात आहे. या कथीत घोटाळ्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, नीट रद्द करून नव्याने घ्यावी व दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने डॉ. राधाकृष्ण लोंढे यांनी केली आहे. 

संपूर्ण देशात “नीट “ च्या कथीत घोटाळ्याप्रकरणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रीय टेस्टींग एजन्सी व भारत सरकारने प्रेस्टीज ईश्यू न करता 23 लक्ष विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. नीटच्या गडबडीमुळे अपात्र विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश मिळू शकेल आणि हेच भावी डॉक्टर्स बनतील. यांच्या हाती जनतेचे आरोग्य सुरक्षित कसे राहू शकेल अशी शंका वाटते. 

गेले दोन आठवडे संपूर्ण देशात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. विद्यार्थी व पालक संभ्रमावस्थेत असुन भयंकर मानसिक ताण तणाव खाली वावरत आहेत. सरकार तर्फे शिक्षण मंत्री व एन टी ए प्रमुखाकडून या संदर्भात खुलासा करण्यात आला आहे. परंतु या खुलासे वर समाधानी नसुन विद्यार्थी व पालक एन टी ए आणि केंद्र सरकार वर नाराज आहेत. नीट मधील कथीत घोटाळे समोर येऊ लागले आहेत. कांही पालक, विद्यार्थी, कोचिंग क्लासेस चालक, कॉनसेलर्स, विधीज्ञ मंडळी हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात गेली आहेत. यावर सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी व विद्यार्थ्यां मध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी नीट च्या कथीत घोटाळ्याची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली सी बी आय मार्फत करून दोषींना कठोर शिक्षा ठोठावणे खूप आवश्यक आहे. अशी इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी आहे. असे केल्याने राष्ट्रीय टेस्टींग एजन्सी वरील विश्वास वाढेल व सर्वांना न्याय मिळेल.

 
Top