उमरगा (प्रतिनिधी)- रोहिणी नक्षत्रात पडलेल्या पावसानंतर मृग नक्षत्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने बळीराजा पेरणीसाठी धावपळ करत आहे. बि बियाण्यांची जमवाजमव करुन काळया आईची ओठी भरणेसाठी चाढयावर मुठ धरत आहे. मृग नक्षत्रात रोजच पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यात 164.60 मिमी म्हणजे 148.70 टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर सोमवारी एका दिवसात तालुक्यात सरासरी 60.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील मुळज व नारंगवाडी मंडळमध्ये सोमवारी अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे ओढे, नाले व नदीला पूर आला होता. ढगफुटी सदृश पावसामुळे बांध फुटुन अनेकांच्या शेतातील माती वाहून गेली आहे. 

उमरगा तालुक्यात मागील वर्षी अत्यल्प पावसामुळे तलाव कोरडे पडले होते. उन्हाळ्यात तीन महिने सुर्य आग ओकत होता. उन्हाने जिवाची काहीली होत आसतानाच रोहिणी नक्षत्रात पावसाच्या आगमनाने नागरीक सुखावले होते. या वर्षी हवामान विभागाने सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज वर्तवल्याने बळीराजांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर चालू वर्षी वरुणराजाने कृपादृष्टी केली आहे. मे महिन्यात भाग बदलून पडलेल्या पावसानंतर जून महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मृग नक्षत्र निघाल्यापासून उमरगा तालुक्यात पावसाने जोर धरला आहे. जून महिन्यात 10 दिवसापैकी 1, 2 व 4 जून वगळता उर्वरीत 7 दिवस पावसाने हजेरी लावली आहे. (कंसात टक्केवारी) जूनमध्ये तालुक्यात सरासरी 164.60 (148.70%) पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. यामध्ये उमरगा 170.50 (154.00%), दाळींब 175.70 (158.70%), नारंगवाडी 148.10 (133.80%), मुळज 182.40 (132.20%) तर मुरुम मंडळमध्ये 146.60 (132.20%) मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. 11 जूनपर्यंतच्या सरासरीच्या 148.70 टक्के पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी एका दिवसात तालुक्यात 60.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये उमरगा मंडळ 52.30, दाळींब 37.00, नारंगवाडी 101.30, मुळज 86.00 तर मुरुम मंडळमध्ये 27.00 मिमि पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील मुळज व नारंगवाडी मंडळमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे, नाले व नदीला पूर आला होता. गुगळगावच्या ओढयाला पूर आल्याने पुलावरुन पाणी वाहत होते. ढगफुटी सदृश पावसामुळे बांध फुटुन अनेकांच्या शेतातील माती वाहून गेली आहे.  माडज, मुळज, गुगळगाव, कोरेगाव, तुरोरी, बेडगा, गुंजोटी आदीसह अनेक गावांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे बांध फुटून मोठया प्रमाणावर माती वाहून गेली आहे. नदी ओढयाला पूर आला होता तर कोरड्याठाक तलावात मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने बळीराजा पेरणीसाठी धावपळ करत आहे. बि बियाण्यांची जमवाजमव करुन काळया आईची ओठी भरणेसाठी चाढयावर मुठ धरत आहे.

 
Top