धाराशिव (प्रतिनिधी)-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर 2 लाख मताधिक्याने निवडून आले आहेत. या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून, त्यापैकी पाच ठिकाणी शिंदे शिवसेना व भाजपचे आमदार आहेत. असे असतानाही सहाही विधानसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांना पहिल्या फेरीपासून मताधिक्य मिळत गेले. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांना 2 लाखाच्या पुढे लीड मिळाली आहे. 

उस्मानाबाद लोकसभा मतदासंघात औसा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. याठिकाणी भाजपाचे अभिमन्यू पवार आमदार आहेत. तर बार्शी विधानसभा मतदारसंघात भाजपचे राजेंद्र राऊत आमदार आहेत. तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे राणाजगजितसिंह पाटील आमदार आहेत. उमरगा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले आमदार आहेत. तर भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री तानाजी सावंत आमदार आहेत. तर उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघात कैलास पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे एकमेव आमदार आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात भाजप व शिवसेना शिंदे गटाची ताकद जास्त असताना देखील पहिल्या फेरीपासून ओमराजे निंबाळकर यांना मताधिक्य मिळत गेले. 17 व्या फेरी अखेर या सहाही मतदारसंघातून 2 लाख 17 हजार 349 एवढे मताधिक्य मिळाले. 17 व्या फेरी अखेर अर्चना पाटील यांना 2 लाख 83 हजार 502 मते मिळाली होती. तर विजयी खासदार ओमराजे निंबाळकर यांना 5 लाख 851 मते मिळाली होती. 17 व्या फेरी अखेर 8 लाख 62 हजार 105 मतमोजणी झाली होती. या निवडणुकीमध्ये 12 लाख 72 हजार 969 एवढे मतदान झाले होते. ही मतदानाची टक्केवारी 63.88 टक्के होती. 


 
Top