भूम (प्रतिनिधी)- वाशी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र लिंबाजी शिंदे यांच्यावर भूम पोलीस ठाण्यात विनयभंग प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एका महिलेच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र लिंबाजी शिंदे, सुनिता गोविंद मस्के राहणार बीड व प्रवीण नावाचा चालक या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना भूम शहरातील पार्डी रोड लगत असणाऱ्या शासकीय विश्रामगृह समोरील तुळजाई निवास येथे घडली आहे. 

याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वाशी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे हे भूम येथील शासकीय विश्रामगृहा समोरील तुळजाई निवास येथे सुनिता गोविंद मस्के राहणार बीड या महिलेसोबत राहत होते. ते येथे अधून मधून येत असत. फिर्यादी ही आरोपी सुनीता गोविंद मस्के हिची मैत्रीण आहे. बुधवार दि. 5 जून रोजी दुपारच्या सुमारास रवींद्र शिंदे यांनी फिर्यादी महिलेस पिण्यासाठी पाणी मागितले. महिला ही घरामध्ये पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर आरोपी शिंदे हा तिच्या पाठीमागे घरामध्ये गेला व तिच्या डावा हातात पकडून आय लव यू असे म्हणत तिचा विनयभंग केला. तसेच गुरुवार दि. 6 जून रोजी आरोपी सुनीता मस्के हिने फिर्यादीस आरोपी रवींद्र शिंदे यांच्यासोबत एकाच बेडरूम मध्ये झोपा असे म्हणाली. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास या दोघांनी फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाने धाराशिव जिल्ह्यातील पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुढील तपास भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी हे करत आहेत.

 
Top