धाराशिव (प्रतिनिधी)-समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक व्यक्तीचा विकास होण्यासाठी सहकाराची आवश्यकता आहे. विना सहकार नाही उद्धार हे सर्वार्थाने प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येकाने सहकारातून समृद्धीकडे जाण्यासाठी काम करणाऱ्या सहकार भारती सोबत जोडून काम करण्याची गरज सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी व्यक्त केली. ते धाराशिव येथे सहकार भारतीच्या वतीने आयोजित इफको या आशिया खंडातील सर्वात मोठ्या इफको या कंपनीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल कळंब येथील डॉ. वर्षा कस्तुरकर यांच्या सत्कार समारंभात बोलत होते. 

यावेळी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे, अखिल भारतीय सेवा भारतीच्या सचिव श्रीमती चंद्रिका भाभी चव्हाण, सहकार भारतीचे धाराशिवचे अध्यक्ष संतोष तौर , उपाध्यक्ष उध्दव गपाट, जिल्हा मंत्री डॉ. हर्षल डंबळ आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. कस्तुरकर यांनी संचालक म्हणून, इफ्को या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते यासह इतर उत्पादनांसोबत शेतीसाठी ड्रोनदीदी यासारख्या केंद्र सरकारच्या नवनवीन योजना राबवाव्या. अशी अपेक्षाही पाचपोर यांनी व्यक्त केली. चेअरमन वसंतराव नागदे यांनी सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणा, चारित्र्य यासह पारदर्शकता ठेवल्यास लोकांच्या विश्वासाला पात्र ठरून उत्तम काम करता येते असा विश्वास व्यक्त केला. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर कस्तुरकर यांनी आगामी काळात धाराशिव जिल्हा सह महाराष्ट्रात आणि देशात शेतकऱ्यांसाठी इफ्कोच्या सर्व योजना बी बियाणे खते यासह ड्रोन दिदी या महिला शेतकऱ्यांसाठीच्या योजनांवर भर देणार असल्याचे सांगितले.

सत्काराला उत्तर देताना डॉक्टर कस्तुरकर यांनी आगामी काळात धाराशिव जिल्हा सह महाराष्ट्रात आणि देशात शेतकऱ्यांसाठी इफ्कोच्या सर्व योजना बी बियाणे खते यासह ड्रोन दिदी या महिला शेतकऱ्यांसाठीच्या योजनांवर भर देणार असल्याचे सांगितले. यावेळी श्रीमती चंद्रिका चव्हाण यांचेही भाषण झाले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष तौर यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर हर्षल डंबळ यांनी मानले. अभिलाष लोमटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला धाराशिव जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांचे पदाधिकारी तसेच कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top