धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झालेले लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या देदिप्यमान  यशामध्ये धाराशिव-कळंब लोकसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख कैलास  पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी एकमेव धाराशिव-कळंब विधानसभा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे आ.कैलास  पाटील यांनी खिंड लढवून लोकसभेत ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना पुन्हा लोकसभेत संधी दिली. त्यामुळे आ.कैलास पाटील हेच किंगमेकर ठरल्याचे बॅनर धाराशिव शहरात झळकत आहेत.

धाराशिव शहरातील महात्मा बसवेश्वर चौक, छत्रपती शाहुनगर, अष्टविनायक चौक व इतर भागात किंगमेकर कैलास  पाटील अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर संघटक प्रशांत साळुंके  म्हणाले की, धाराशिव लोकसभा मतदारसंघात बार्शी, परंडा-भूम-वाशी, तुळजापूर, उमरगा, औसा या विधानसभा मतदारसंघातील आमदार हे महायुतीत आहेत, आणि धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील हे एकमेव आमदार आहेत. त्यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघाची खिंड लढवून विरोधी उमेदवारांना गारद केले. म्हणून कैलास पाटील हेच या लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरल्याची प्रतिक्रिया साळुंके यांनी दिली.

 
Top