परंडा (प्रतिनिधी) - भारतीय योगसाधनेला सुमारे पाच हजार वर्षांची वैभवशाली परंपरा आहे.योग हा प्राचीन भारताचा अनमोल ठेवा आहे. शरीर व मन यांच्यातील आंतरिक नात्याला योगाभ्यासात अनन्यसाधारण महत्व आहे असे मत येथील डॉ.आनंद मोरे यांनी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचालित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून डॉ. आनंद मोरे उपस्थित होते.  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल जाधव हे उपस्थित होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

डॉ. आनंद मोरे यांनी योगाचे विविध प्रकार विषद केले. पुढे बोलताना ते म्हणाले कि, मानवी जीवनात मानसिक संतुलन,समग्रता,आत्मशांती,शारीरिक स्वास्थ्य लाभणे,ही योगाभ्यासाची मुख्य उद्दिष्टे आहेत.योग हा मूळ संस्कृत शब्द असून,त्याचा अर्थ जोडणे वा जुळविणे असा होतो. योग विद्येतून शरीर व मन या दोन घटकांना एका धाग्यात ओवून त्यांच्यात मेळ घातला जातो. थोडक्यात योग मार्गाचा अवलंब केल्याने निरोगी आरोग्य लाभून निरामय जीवनाची दृष्टी लाभते.

सध्याच्या धावत्या जगात माणसात ताणतणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच आधुनिक विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मानवाच्या जीवनशैलीत (लाईफ स्टाईल) आमूलाग्र बदल होताहेत. 

त्यामुळे काही प्रमाणात युवकांमध्ये चंगळवाद वाढीस लागला आहे.जेवणाच्या ताटात चौरस आहाराची जागा आता पिझ्झा,बर्गर,चायनीज फूडने घेतली असल्याचे सर्वत्र आढळते.त्यात स्पर्धात्मक युगाची भर पडली आहे.परिणामी युवकांच्या स्वास्थ्यावर याचे विपरित परिणाम होत असल्याचे प्रकर्षाने दिसते.अशा ताणतणावाच्या कारणांमुळे भारत ही आता मधुमेह ची जगाची राजधानी झाली आहे.आजच्या युवा पिढीच्या आहारामधील जंकफूड चे वाढते प्रमाण बघता, मधुमेहसह रक्तदाब,लठ्ठपणा, एसिडीटी हे विकार जडत चालले आहेत.हे सर्व घालविण्यासाठी योग साधना करणं काळाची गरज बनली आहे. स्पर्धेच्या युगात युवा वर्गात नोकरी,व्यवसायसंदर्भात मोठा ताणतणाव असतो. या पार्श्वभूमीवर मानवी जीवनातून ताणतणावाच्या गोष्टी कायमच्या हटविण्यासाठी योगसाधनेची कास धरणे आवश्यक आहे.कारण त्यातून मन स्थिर तर,शरीर चपळ व सुदृढ होण्यास बळ मिळते. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग शारीरिक शिक्षण विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ शहाजी चंदनशिवे यांनी करून  उपस्थितांचे आभार मानले.

 
Top