तुळजापूर (प्रतिनिधी)-  धाराशिव लोकसभा मतदार संघातुन अखेर महाविकास आघाडीतील  शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर दुसऱ्यांदा तुळजापूर विधानसभा मतदार संघातील मिळालेल्या मताधिक्यामुळे दणदणीत विजय होताच. तुळजापूर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी कार्यकर्त्यानी छञपती शिवाजी महाराज पुतळा व श्री तुळजाभवानी मंदीर महाध्दार समोर फटाके फोडून कुंकवाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. तुळजापूर तालुका व शहर भागात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाल्याचे दिसुन आले.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेले तिर्थक्षेञ तुळजापूर येते. या मतदार संघातील मतदारांनी आपल्याशी संवाद साधणारा, कुठल्याही कामाला धावुन येणाऱ्या उमेदवाराला मतदान केले.  विद्यमान खासदार ओमराजे निबाळकर यांच्या  फोनद्वारे संपर्कानेच त्यांना तारल्याचे बोलले जाते. ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारात तनमनाने काम करणारे कार्यकर्ते होते. ठेकेदार कार्यकर्त्यांचा भरणा नव्हता.त्यामुळे येथे महाविकास आघाडी उमेदवाराला मागील वेळी पेक्षा शहर व तालुक्यातुन मताधिक्य मिळाले.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक  65.40 टक्के मतदान झाले होते. तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा आहे. युवा नेते सुनिल चव्हाण यांंच्या काँग्रेसमधुन भाजप प्रवेश झाला. तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांनी महायुती उमेदवाराला अखेरच्या क्षणी  पाठीबा दिला. काँग्रेस नेते मधुकर चव्हाण प्रकृती अस्वस्थतामुळे प्रचारात फारसे सक्रिय राहिल्याचे दिसुन आले. तरीही महाविकास आघाडीला मिळालेले मताधिक्य हे विशेष आहे.


 
Top