धाराशिव (प्रतिनिधी)-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होत असल्याचे चित्र दिसले असले तरी ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडी व शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना या निवडणुकीत 3 लाख 29 हजार 846 मताधिक्य घेवून विजयी झाले आहेत. ओमराजे निंबाळकर यांना 7 लाख 48 हजार 752 मते मिळाली. तर महायुती तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांना 4 लाख 18 हजार 906 मते मिळाली.


व्हिईएम मशीन ठेवलेल्या रूमचे सील सर्व लोकप्रतिनिधी समोर काढण्यात आले. उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, परंडा, औसा, बार्शी या 6 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी 6 हॉलमध्ये सकाळी 8 वाजता सुरू झाली. एका हॉलमध्ये 14 टेबल या प्रमाणे मतमोजणी झाली. एकाच वेळी 84 वोटिंग मशीनवरील मतमोजणी केली. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या 30 फेऱ्या तर औसा विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या 22 फेऱ्या तर उमरगा विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या 23 फेऱ्या, तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या 29 फेऱ्या, परंडा विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या 27 फेऱ्या, बार्शी विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या 24 फेऱ्या झाल्या आहेत. सायंकाळी पाचपर्यंत मतमोजणीच्या 21 फेऱ्या झाल्या होत्या. पहिल्या फेरीपासूनच ओमराजे निंबाळकर यांना मताधिक्य मिळत गेले. त्यामुळे सकाळी 10 पासून शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यास सुरूवात झाली. जसजसे मताधिक्य वाढत गेले. त्याप्रमाणे शिवसेना व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. बॅन्ड पथकासह कार्यकर्ते भगवा, हिरवा गुलाल उधळून झेंड फडकवित असल्याचे दिसून आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही केली. मतदान केंद्राहून येताना ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जेसीबीने हार घालून व गुलाल उधळून विजयी उत्सव साजरा केला. 


सगळ्या जास्त मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांना 3 लाख 30 हजार 794 मताचे मताधिक्य मिळाले. ओमराजे निंबाळकर यांचे हे मताधिक्य मराठवाडा व महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. जास्तीत जास्त मताधिक्याने लोकसभा निवडणुकीत निवडून येण्याचा विक्रम ओमराजे निंबाळकर यांच्या नावावर होत असल्याचे दिसत आहे.

 
Top