तुळजापूर (प्रतिनिधी)-धाराशीव लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. मतमोजणीचा दिवस जवळ आल्यामुळे  काय  होणार ? हा प्रश्न सर्रास एकमेकांना विचारला जाऊ लागला आहे. राजकीय कार्यकर्त्यांच्या पैजांना उधाण आले आहे.  रोख पैसे पार्ट्यांच्या  पैजा लावल्या जात आहेत.

आमचाच उमेदवार निवडून येणार, असे महायुती, महाविकास आघाडी समर्थक छाती टोकुन सांगत आहेत.

महाविकास आघाडीकडुन शिवसेना उबाठा कडून  विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर तर महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटकडुन अर्चना पाटील यांच्यातील दुरंगी लढत आहे.धाराशिव  मतदार संघातील धाराशीव कळंब ,तुळजापूर, भूम-परांडा-वाशी, उमरगा-लोहारा  तर लातुर जिल्हयातील औसा तालुका व निलंगा तालुक्यातील सात ते आठ गावे व सोलापूर जिल्हातील बार्शी असा हा लोकसभा मतदार संघ आहे.

या  विधानसभा मतदारसंघात कुणाला किती लीड मिळणार, याबद्दलचे अंदाज मांडले जात आहेत. खास करुन या मतदार संघावर भाजपने  महायुतीचा झेंडा फडकावयाचा याचा चंग बांधला होता. म्हणून भाजप उमेदवार नसताना येथे मोदीची सभा झाली होती. त्यामुळे राज्याचे लक्ष धाराशिव निकालाकडे लागले आहे. कारण सर्वाधिक घडामोडी या मतदारसंघात घडल्या आहेत. या निकालावर जिल्हयाचे आगामी भवितव्य अवलंबून असल्याने सर्व पक्षांना येथील निकाला बाबतीत प्रचंड उत्सुकता लागली आहे. चुरशीने आणि इर्षने  मतदान झाले आहे. कोण पडणार आणि कोण जिंकणार, या चर्चा मतमोजणीचा दिवस जवळ आल्याने रंगत आहेत. विधानसभा निहाय मतदानाचे लीड सांगितले जाऊ लागले आहे.  4 जून रोजी मतमोजणी आहे. सुरुवातीच्या दोन तासानंतर जवळपास कौल स्पष्ट व्हायला सुरू होईल, या आगामी घडामोडींची खमंग चर्चा चौकाचौकात आणि चावडीच्या कट्ट्यांवर सध्या जोरदार सुरू आहे. सोशल मीडियावर तर 24 तास निवडणूक अंदाजाचे दळण दळले जात आहे.  आता दस्तुरखुद्द उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. कारण कुणालाही मतदार राजाचा अंदाज आलेला नाही. मतदार राजाने कुणाला कौल दिला आहे, याचा फैसला मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

 
Top