वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील तेरखेडा येथील संतोष फायर वर्क्स या फटाक्यांच्या कारखान्यात दि. 24 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जोरदार स्फोट होवून त्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून फटाका कारखान्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तालुक्यातील तेरखेडा नांदगाव रोडवरील आबा सरवदे यांच्या संतोष फायर वर्क्समध्ये फटाके बनवण्याचे मिश्रण करीत असताना अचानक भिषण स्फोट झाला स्फोटाची तीव्रता इतकी होती की आसपासच्या परिसरात दूरवर आवाज ऐकून लोक कारखान्याच्या दिशेने पळत सुटले. स्फोटानतंर दोन ते तीन किमी अंतरापासून आकाशात धुराचे लोट दिसत होते. सध्या वातावरणात कमालीची वाढलेली असून फटाके तयार करण्यासाठी मिश्रण तयार करत असताना त्याची घाणी टाकायला जात असताना रूममध्ये भीषण स्फोट झाला. यात खोलीचा स्लॅब कोसळला व भिंतीचे तुकडे केमिकलचे डबे उडून दूरवर फेकले गेले. यामध्ये चांगदेव धावारे वय 50 वर्षे हा कामगार गंभीररित्या भाजून जखमी झाला असून त्यास उपचारासाठी लातूर येथील लहाने हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. स्फोटामुळे वातावरण केमिकलयुक्त धूराचे लोळ पसरले असून जखमी कामगाराला बाहेर काढताना व आग विझवताना मोठा त्रास सहन करावा लागला. स्फोटाची माहिती मिळताच वाशीचे तहसिलदारांनी व येरमाळा पोलीसंनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. तेरखेडा व परिसरातील फटाका कारखान्यात सतत होत असलेल्या स्फोटामुळे कारखाना व कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.