धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती असून गरजेप्रमाणे बोअर अधिग्रहण व टँकर उपलब्ध करून देण्यासह रोजगार हमी योजनेची कामे वाढविण्याच्या सूचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडी अडचणी जाणून त्यांची सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी कार्यालय, तुळजापूर येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.

तुळजापूरसह इतर तालुक्यातील अनेक नागरिकांनी येथे उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडल्या. पिण्याचे पाणी, महावितरण, रोजगार हमी योजनेची कामे, रस्त्यांची रखडलेली कामे मार्गी लावण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.


नुकसानीची पाहणी 

काल सायंकाळी धाराशिव तालुक्यातील काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे घरे, गोठे व फळबागांचे मोठे नुकसान झाले असून आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी आज इर्ला, दाऊदपुर, भंडारवाडी परिसरात जावून नुकसानीची पाहणी केली. प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या वादळी वारे व पावसाने घरावरील पत्रे उडून गेले असून अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. मोडून पडलेला संसार, उघड्यावर आलेली लहान लेकरे असे हृदयद्रावक चित्र होते. नागरिकांनी, शेतकरी बांधवांनी धीर धरावा, शासनाच्या माध्यमातून त्यांना मदत मिळवून देण्याचा नक्की प्रयत्न राहणार आहे. अतिशय भीषण व विदारक परिस्थिती असून शेतकरी व ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचा विश्वास आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला आहे.

 
Top