भूम (प्रतिनिधी) - तालुक्यातील पेढ्यासाठी प्रसिध्द असणारे पाथरूड गाव वेगळ्याच कारणामुळे प्रकाशझोतात आले आहे. गावातील एक गुंड प्रवृत्तीच्या तरुणाने गावात दहशत पसरवण्यास सुरू केली आहे. गावातील या गुंड तरुणाचा पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त करावा या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी यांना गावकऱ्यांनी निवेदन दिले आहे. तसेच ऐन बाजार दिवशी पाथरूड गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले.

सदरील गंभीर गुन्ह्यातील मोकाट आरोपी ज्याच्यावर 307, 324,504 व इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो आरोपी पाथरूड व भूम तालुका तसेच इतर परिसरामध्ये मोकाट फिरून खुलेआम दहशत पसरवीत आहे. पिस्तूल व इतर धारदार शस्त्र यांचा वापर करत आहे. त्याच्या या दहशतीने पाथरूड व सबंध भूम तालुका भयभीत झाला आहे, तसेच सर्वसामान्यांची जगणे सुद्धा मुश्किल झाले असून, अनेक नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तरी सदर गुंडाची पोलीस व प्रशासन यांनी त्वरित दखल घेऊन कठोर कारवाई करावी व त्याला तडीपार करण्यात यावे ही सर्व समस्त पाथरूड ग्रामस्थांची विनंती आहे. आज रोजी समस्त पाथरूड गाव गुंडगिरीच्या निषेधार्थ संपूर्णपणे बंद आहे. जर पुढील कारवाई त्वरित न झाल्यास तुळजापूर- नगर राज्य मार्गावर सर्व ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल या आशयाचे निवेदन गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी भूम यांना दिले आहे.

 
Top