धाराशिव (प्रतिनिधी)-विरोधकांकडे आज मुद्दे नाहीत, इतके काम मोदींनी करुन ठेवले आहे. ‌‘अब की बार 400 पार'चा नारा देशवासीय सत्यात आणतील. नागरिकांच्या उस्फूर्त प्रतिसादात उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा क्षेत्रात  यावेळी महायुती विजयोत्सव साजरा करेल, असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

कळंब येथे शनिवारी सायंकाळी महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची प्रचारसभा पार पडली. व्यासपीठावर आमदार राणाजगजितसिंह पाटील, लोकसभा निवडणूकप्रमुख तथा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अजित पिंगळे, शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, सबका साथ, सबका विकास साधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात यावेळी विजय मोठ्या उत्साहात पार पडणार. कारण एखादे व्यापक काम हातात घेतले तर सर्व अडचणींवर मात करुन ते पूर्णत्वास घेऊन जाण्याची धमक असणारे नेतृत्व म्हणजे अर्चनाताई पाटील आहेत, असे गौरवोद्गार काढून त्यांना सामान्यांनी मतरूपी आशीर्वाद देणे म्हणजे मोदींना पाठबळ असल्याचा उल्लेख मुंडे यांनी केला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, नितीन काळे, अजित पिंगळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील नागरिक उपस्थित होते.


 
Top