धारशिव (प्रतिनिधी)-  पोलीस बनण्याचे स्वप्न पाहून त्यादिशेने वाटचाल करणारी तरुणाई खूप मेहनत घेत असते. मात्र अनेकदा काही कारणांमुळे या स्वप्नांवर पाणी फिरतं. असंच एका तरुणासोबत घडलं आणि त्याचं खाकी वर्दीचं स्वप्न अधुरंच राहिलं. तरुणासोबत खूप धक्कादायक घडून त्याचा मृत्यू झाला. हे समोर आलेलं प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळा लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही समोर आलेली घटना धारशिव शहरात घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दोघे मित्र काल बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शहरातील तुळजाभवानी क्रीडा संकुलात गोळाफेकचा सराव करीत होते. हा सराव सुरू असतानाच फेकलेला गोळा मार्कींग करणाऱ्या मित्राच्या डोक्यात लागून तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपस्थित डॉक्टरांनी तो मृत असल्याचं सांगितलं. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

धाराशिव शहरातील दर्गाह परिसरातील गाझीपुरा भागातील रहिवासी असलेला तरूण मुस्तकीम जावेद काझी 21 वर्षाचा होता. त्याचा मित्र आणि तो मागील तीन-चार महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी करीत आहेत. हे दोघे गोळाफेकचा सराव करण्यासाठी नियमितपणे श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलात येत असायते. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हे दोघे क्रीडा संकुलात दाखल झाले. लागलीच गोळा फेकण्याचा सराव सुरू केला. एकजण गोळा फेकण्याचा सराव करीत असताना दुसरा त्याची मार्कींग करीत होता. आलटून-पालटून हा सराव केला जात होता. गोळाफेकचा सराव झाल्यानंतर मुस्तकीम जावेद काझी हा तरूण मार्कींगसाठी पुढे गेला. याचवेळी मित्राने गोळा फेकला असता, तो काझी याच्या डोक्यात गंभीर मार लागल्याने मुस्तकीम जावेद जमिनीवर कोसळला. जखमी अवस्थेत त्याला मित्राने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता, त्याला मृत घोषित केलं.रात्री उशिरा उत्तरीय तपासणी झाल्यानंतर आनंदनगर पाोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 
Top