प्रतिनिधी | धाराशिव

खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपलेला असल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसे उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांना शेतकऱ्यांना पीककर्ज पुनर्गठन करण्याबाबत आदेशित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. कार्यवाही न झाल्यास बँकांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दुधगावकर यांनी निवेदनात दिला आहे.

सन 2023-24 या वर्षात पेरणी होऊनही कमी पावसामुळे उत्पादन घटले. पिकाला बाजारपेठेत योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे पडत्या भावात सोयाबीन, हरभरा व इतर पिके विकावी लागली. मागील महिन्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष, केळी, आंबा, फळबागा, ज्वारी, कडबा, पालेभाज्यांना बसला आहे. निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या खाईत लोटलेला असताना  शासनाने आठ तालुक्यांपैकी तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. जनावरांच्या चारा, पाण्याची वाणवा आहे. 2023 चा पिकविमा शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. दुष्काळी अनुदानही न मिळाल्याने पेरणीसाठी मशागती करताना आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून खरीप हंगामापूर्वी जिल्ह्यातील सर्व बँकांना शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्गठन करण्याबाबत आदेशित करावे, अशी मागणी दुधगावकर यांनी केली आहे. 


 
Top