प्रतिनिधी | भूम 

भूम तालुक्यामधील अनेक गावांमध्ये जलसंकट भीषण झाले आहे. जून महिना जवळ येत आहे तसतसे पाणी टंचाईचे संकट भीषण होत आहे.  ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे तेथे विहीर, बोअर अधिग्रहण करून टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. भीषण पाणीटंचाईच्या काळात अनेक गावांमध्ये नागरिकांना दूषित पाण्यावर तहान भागविण्याची वेळ आली असल्याचे पाणी नमुने तपासणी अहवालावरून दिसून येत आहे.

भूम तालुक्यात 96 गावे आहेत. या गावांचा कारभार 74 ग्रामपंचायतच्या माध्यमातून चालतो. तालुक्यात बोटावर मोजण्याइतके प्रकल्प वगळता इतर प्रकल्प कोरडेठाक आहेत.  भूम तालुक्यातील पाणी नमुने जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा धाराशिव, उपविभागीय प्रयोगशाळा व लघु प्रयोगशाळा येथे पाठवले जातात. हे पाणी नमुने भूम तालुक्यातील आंबी, ईट, माणकेश्वर, पाथरूड, वालवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून तपासणीसाठी पाठविले जातात. एप्रिल 2024 मध्ये भूम तालुक्यातील एकूण 91 पाणी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 16 टक्के म्हणजेच 15 पाणी नमुने दूषित आढळून आले. आंबी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सर्व पाणी नमुने पिण्यायोग्य आढळून आले. ईट प्राथमिक आरोग्य केंद्राकडून 21 नमुने पाठविले होते. त्यापैकी 24 टक्के म्हणजेच 5 पाणी नमुने दूषित आढळले. यामध्ये नागेवाडी, पाडोळी,  माळेवाडी, चिंचोली या गावांचा समावेश आहे.  माणकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाठविण्यात आलेल्या 20 पैकी 6 म्हणजेच 30 टक्के नमुने दूषित आढळले. त्यामुळे ऐन पाणीटंचाई काळात जनतेला दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याचे दिसत आहे.याकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. 


 
Top