धाराशिव (प्रतिनिधी)-शेतकऱ्यांच्या समस्या सांगून आपल्याकडून साडेनऊ कोटी रूपये घेतले. जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष बापूराव पाटील, सुरेश बिराजदार, सुनील चव्हाण हे सगळे त्या गोष्टीचे साक्षीदार आहेत. तेरा वर्षांपूर्वी घेतलेल्या साडेनऊ कोटी रूपयांपैकी एक रूपयाही आजपर्यंत परत केलेला नाही. खोटे बोलून खासदाराने आपली फसवणूक केली. मात्र वीस लाख मतदारांची फसवणूक आता होऊ देणार नाही, असे सांगत तेरणा कारखान्यातील भंगारही विद्यमान खासदाराने विकले असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा सणसणीत आरोप पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केला आहे.

कळंब तालुक्यातील मोहा, खामसवाडी येथे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची प्रचारसभा झाली. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील उपस्थित होते. सिंचनवाढीसाठी उजनीचे पाणी, वॉटर ग्रीड आणि जलयुक्त शिवार या तीन महत्वाच्या योजना आणि प्रकल्पांसाठी 34 हजार कोटी रूपयांची तरतूद केली. मराठवाड्याच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पाची योजना सुध्दा महाविकास आघाडीच्या सरकारकडून बासनात गुंडाळण्याचा ठाकरे सरकारकडून प्रयत्न झाला. 2019 पासून आजतागायत विरोधी उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांनी केंद्र सरकारची एक तरी योजना जिल्ह्यासाठी आणली का? असा सवाल उपस्थित करत राजेनिंबाळकर यांच्या निष्क्रियतेवर टीकास्त्र सोडले.

मागील विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही आमदाराचा विचार न घेता, जनतेच्या भावनेचा आदर न ठेवता स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. त्यामुळे राज्याच्या विकासाला खीळ बसली. त्यानंतर शिवसेनेने उठाव करून महायुतीचे सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारने जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी काम सुरू केले. त्यामुळे जनतेच्या भावनेचा आदर न ठेवणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आता घरी बसवून महायुतीच्या अर्चनाताई पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे, असे आवाहन पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.


 
Top