धाराशिव  (प्रतिनिधी) - तालुक्यातील गौडगाव ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत करण्यात आलेल्या दलित वस्ती सुधार योजना व इतर विविध विकास योजनेच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा व भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे संबंधित घोटाळा व भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दलित बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे दि.30 मे रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव तालुक्यातील गौडगाव ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत दलित वस्तीमध्ये सुधार योजना व गाव सुधारणा करण्यासाठी विविध विकास कामे करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. यामध्ये दलित वस्तीमध्ये सुधार योजने अंतर्गत कामामध्ये घोळ, दलित वस्तीमध्ये पाणी पुरवठा व गावातील नळ योजना कामांमध्ये घोटाळा, आर.ओ. प्लॅन्टमध्ये जमा होणाऱ्या पैशाचे कुठलेही रेकॉर्ड नाही. त्यामुळे या प्लॅन्टमधील मिळणाऱ्या पैशामध्ये गैरव्यवहार झालेला दिसून येत आहे. तसेच दलित वस्तीमध्ये सांड पाण्याची उपाययोजना अद्यापपर्यंत राबवलेली नाही.

त्यामुळे गावातील दुषित सांडपाणी घरामध्ये शिरत आहे. तर दलित वस्तीमध्ये सिमेंट काँक्रीट रोडचे केलेले काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. तसेच मनरेगा रोजगार हमी योजने अंतर्गत गावातील दलित बांधवांची कामासाठी मिळणे आवश्यक होते. मात्र तसे न करता बोगस लोकांची नावे नोंद करून आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे गावातील नदीचा कोल्हापुर बंधारा गायब करून नदीचा प्रवाह बदलून आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून स्मशानभुमिवर दलितांची हेळसांड केली आहे. तर ग्रामपंचायमधील जुने रेकॉर्ड गायब केले आहे. यामध्ये जि. प. शाळेची महत्वाची कागदपत्रे, सिंचन विहीरीबाबतचे कागदपत्रे, सभागृहाची कागदपत्रे यांचा समावेश आहे. तर सामाजिक सभागृहामध्ये इतर धर्मियांना येण्यास मज्जाव करून गावामध्ये धार्मिक संघर्ष पेटवण्याचे काम ग्रामपंचायत कार्यालयाने केले आहे. तसेच मुस्लिम दफनभुमीचे संरक्षण भिंत ग्रामपंचायतच्या गहाळ कारभारामुळे पडली तर गावातील व्यायाम शाळा बंद करून तेथे राहण्यासाठी वापर केला जात आहे. दलित वस्तीमधील शासकीय बोअरवेलमधील पाण्याची मोटार, वायर ग्रामपंचायत कार्यालयाने गहाळ केल्यामुळे दलित वस्तीमधील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या घोटाळा व भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर भाई फुलचंद गायकवाड, राजाभाऊ हुंबे, बापू कदम, दत्तात्रय माळदकर, सिद्धार्थ हुंबे, शीतल हुंबे, माजिद मुजावर, फयाज शेख, दगडू पठाण, अनंत हुंबे, साहेबराव आगळे, मुबारक अंदुरकर, शोएब शेख, रिफोज पठाण, दत्तात्रय हुंबे, समीर हुंबे, बाळासाहेब हुंबे, काकासाहेब आगळे, ज्योती आगळे, शकिला अंदुरकर, रेश्मा अंदुरकर, हसिना पटेल, वजीर पटेल, संकेत हुंबे, लहु हुंबे, लक्ष्मी हुंबे, मालीनी हुंबे, आशाबाई हुंबे, वहिदा पटेल, रहेमान पठाण, अतिक पठाण, निलोफर पठाण, लताबाई कदम, ईलाही शेख, रफिक पठाण, आरबाज पटेल, जावेद पटेल, युनूस पटेल, रमेश माळी, श्रीकांत माळी व अकबर पटेल आदींसह इतरांच्या सह्या आहेत.

 
Top