धाराशिव (प्रतिनिधी)-येथील तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांसह चौघा महसूल कर्मचाऱ्यांवर एका सध्या अर्जावर गुन्हा दाखल करणे, बेकायदेशीरपणे रात्री काही कर्मचाऱ्यांना अटक करणे, त्यांना पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देणे, यास प्रकारामुळे कोतवालापासून उप जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचाच पारा चढला. यामुळे जिल्ह्यातील महसूल विभागाच्या तब्बल 1200 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. यामुळे सर्व कामकाज ठप्प झाले. गुन्हा परत न घेतल्यास बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. बुधवार दि. 29 मे रोजी हा बेमुदत दुसरा दिवस आहे. महसूल कर्मचारी संघटनेचे निलेश काळे यांनी ठोस निर्णय लागल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचे सांगितले.

तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे, मंडळ अधिकारी एच. एस. कुदळे, तलाठी जी. आर. शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंत महसूल प्रशासनातील सर्वच अधिकारी व कर्मचारी आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी संपाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे रात्री मंडख अधिकारी कुदळे यांना अटक करण्यात आली. तसेच त्यांना उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास असतानाही रात्रभर पोलिस ठाण्यामध्ये ठेवून सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देण्यात आली. अटक केल्यानंतर पोलिस कोठडीमध्ये एखाद्या सराईत आरोपी प्रमाणे वागणूक देवून घरून पाठवलेल्या जेवणाचा डब्बा सुध्दा देवू दिलेला नाही. अशा प्रकारची वागणूक देवून सर्व कायदेशीर प्रक्रियेचा भंग करून सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत तुकाराम नागरगोजे यांनी गुन्हा दाखल केला आहे. हे शासन परिपत्रकाच्या विरोधात आहे. विहित कार्यपध्दतीचा अवलंब झालेला नसल्यामुळे संबधितांची नावे दाखल आरोपपत्रातून वगळण्याची तत्काळ करावी, तसेच नागरगोजे यांचे तत्काळ निलंबन करावे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याविरूध्द दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात याव, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत जिल्हाभर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. महसूल संघटनेचे अध्यक्ष निलेश काळे, सचिव शुभम काळे, उपाध्यक्ष श्रीकांत अंधारे यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top