धाराशिव (प्रतिनिधी)-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी झालेल्या निवडणुकीत सायंकाळी 6 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार प्राथमिक अंदाजानुसार 63 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. रात्री उशिरापर्यंत प्रत्यक्ष किती टक्के मतदान झाले यांची माहिती मिळेल असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. पूर्ण मतदारसंघात भूम तालुक्यातील पाठसांगवी येथील घटना वगळता मतदान शांततेत मतदान झाले. 

उस्मानाबाद लोकसभेसाठी यावेळी चुरशीचा सामना पहायला मिळाला.  उस्मानाबाद लोकसभेसाठी 31 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले भवितव्य अजमावत आहेत. मात्र खरी लढत ही महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी औसा, उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद, परंडा आणि बार्शी विधानसभा क्षेत्रात 20 लक्ष 4 हजार 282 मतदार आहेत. सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर 11 वाजेपर्यंत 17 टक्के मतदान झाले. तर 1 वाजेपर्यंत 31.57 टक्के मतदान झाले. यावेळेत ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. उस्मानाबाद शहरात दिव्यांग अधिकारी, कर्मचारी संचलित मतदान केंद्र. त्याप्रमाणे सखी मतदान केंद्र. याप्रमाणे विशेष मतदान केंद्र होते. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना उष्णतेचा त्रास होवू नये म्हणून पेन्डाल मारण्यात आले होते. दुपारी 3 पर्यंत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 40.92 टक्के मतदान झाले होते. तर 5 वाजेपर्यंत 52.78 टक्के मतदान झाले होते. यामध्ये औसा विधानसभा मतदारसंघात 55.19 टक्के, बार्शी विधानसभा मतदारसंघात 51.51 टक्के, उमरगा विधानसभा मतदारसंघात 51.69 टक्के, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 52.57 टक्के, परंडा विधानसभा मतदारसंघात 49.34 टक्के, तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 56.06 टक्के मतदान झाले आहे. 

मतदान प्रक्रिया सायंकाळी 6 पर्यत होती. मंगळवार दि. 7 मे रोजी सकाळी मतदानाला सुरूवात झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी कुटुंबासह जावून मतदान केले. गोवर्धनवाडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. ही लोकशाही आणखीन बळकट करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. तर माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, भाजपचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील व त्यांच्या पत्नी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क तेर येथे बजावला. तसेच शिक्षक आमदार विक्रम वसंतराव काळे, प्राचार्य अनिल वसंतराव काळे, श्रीमती शांताबाई वसंतराव काळे, शुभांगीताई विक्रम काळे, संजना विक्रम काळे, मयुरी अनिल काळे, ऐश्वर्या अमोल काळे, रणवीर अनिल काळे यांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच भाजपा नेते, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी धाराशिव लोकसभेकरिता परंडा येथे कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाच्या मतदान केंद्रावर पत्नी सौ. शैला, मुलगी डॉ. सुयशा व मुलगा समरजीतसिंह यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला.


एक घटना वगळता शांततेत मतदान

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील भूम तालुक्यातील पाठसांगवी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान केंद्र होते. या मतदान केंद्राजवळच निवडणुकीच्या कारणावरून बाचाबाची होवून उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे समाधान नानासाहेब पाटील यांचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आला. यासंदर्भात पोलिस सुत्रानुसार दिलेल्या माहितीनुसार मात्र या प्रकरणाचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. सदर प्रकरण हे वैयक्तीक कारणातून झाले असल्याचे पोलिस प्रशासनाने प्रेस नोट काढून सांगण्यात आले आहे. 


 
Top