धाराशिव (प्रतिनिधी)- 4 जून 2024 रोजी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीतील मतमोजणी आहे. ही मतमोजणी शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथे होणार आहे. मतमोजणी दिवशी मतमोजणी केंद्रावर अधिकारी व कर्मचारी यांनी पहाटे 5.30 वाजता उपस्थित राहण्याची वेळ दिली आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी 31 मे 2024 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव यांच्यासह विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. अधिक माहिती देताना डॉ. ओम्बासे यांनी उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, परंडा, औसा, बार्शी या 6 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी 6 हॉलमध्ये होणार आहे. एका हॉलमध्ये 14 टेबल राहणार आहेत. एकाच वेळी 84 वोटिंग मशीनवरील मतमोजणी केली जाणार आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या 30 फेऱ्या होणाऱ्या आहेत. तर औसा विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या 22 फेऱ्या होणार आहेत. उमरगा विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या 23 फेऱ्या होणार आहेत. तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या 29 फेऱ्या होणार आहेत. परंडा विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या 27 फेऱ्या होणार आहेत. बार्शी विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या 24 फेऱ्या होणार आहेत. यासाठी 1200 कर्मचारी व 150 अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर मिरवणुकीची परवानगी नसल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. 

 
Top