धाराशिव (प्रतिनिधी)- महावितरणने राज्यातील 3 कोटी वीजग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा ( आर्टीफिशियल इंटलीजीयन्स ) वापर करून वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ‌‘ऊर्जा' चॅट बॉट 247 महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंग्रजी व मराठी भाषेतील या चॅट बॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येत आहेत. तसेच नवीन वीजजोडणी, वीजबिल भरणा, तक्रार निवारण आदींबाबत माहिती घेण्याची सोय उपलब्ध आहे.

महावितरणच्या वीजसेवेसंदर्भात माहिती कुठे विचारावी आणि या सेवांचा घरबसल्या लाभ कसा घ्यावा हा प्रश्न आता संपुष्टात आला आहे. ग्राहकसेवांबाबत थेट प्रश्न विचारून विविध सेवांचा लाभ व तक्रारी नोंदविण्यासाठी ‌‘ऊर्जा' नावाचे चॅट बॉट महावितरणच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसीत केले आहे. राज्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर ‌‘ऊर्जा' चॅट बॉट  www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरणच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. नवीन वीजजोडणी वा त्यासाठी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती, वीजबिल भरणा किंवा वीजबिलाचा तपशील, जलद वीजबिल भरणा, मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी इतर विविध शुल्कांचा ऑनलाइन भरणा, स्वतः मीटर वाचन व सबमिशन, गो-ग्रीन नोंदणी, वीजवापर व बिलाचे कॅलक्यूलेटर आदींबाबत वीजग्राहकांना ‌‘ऊर्जा' चॅट बॉट थेट मदत करीत आहे.  


 
Top