कळंब (प्रतिनिधी)- येथील बस स्थानकात एसटी व पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कळंब स्थानकात एका 76 वर्षीय वृद्धाचा बस खाली जाऊन मृत्यू झाल्याची घटना दि. 24  रोजी सायंकाळी 5 सुमारास घडल्याने बस स्थानकात मोठी खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिक वृत्त असे की आज येरमाळा येथील चैत्र पौर्णिमा वारी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून देवीच्या चरणी लीन होण्यासाठी लाखो भाविक येरमाळा येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेच भाविक रात्री परतीच्या मार्गाने प्रवास करत असताना कळंब बस  स्थानकावर मोठी तुडुंब गर्दी प्रवाशांची झाली होती. त्यात एसटी प्रशासनाच्या मोडक्या व खुळखुळा झालेल्या बस गाड्या अत्यंत कमी प्रमाणात असल्यामुळे बस मध्ये जागा धरण्याच्या भानगडीत एका वृद्धाचा कळंब   काळेगाव जाणाऱ्या गाडीखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार सायंकाळी 5 सुमारास कळंब बस स्थानकात घडली. यावेळी राप प्रशासनाचे अधिकारी किंवा कर्मचारी व पोलीस प्रशासन नसल्यामुळे प्रवाशांची  तोबा  गर्दी असल्यामुळे धकाधकीत अनेक प्रवाशांना दुखापतही झाले आहे. 

कळंब स्थानकातून बस क्रमांक एम.एच. 14  बी. टी.  1632 ही गाडी सायंकाळी पाचच्या सुमारास काळेगावला जाण्यासाठी कळंब स्थानकात प्लॅटफॉर्मवर लागत असताना प्रवाशांची झुंबड गर्दी उडून त्यात जागा धरण्यासाठी पळापळ झाली. त्यावेळेस महादेव केरबा दिवार रा. काळेगाव ता. केज, जिल्हा बीड वय वर्ष 76 या इसमाचा बस खाली पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. सर्व यंत्रणा तात्काळ अलर्ट झाली आणि प्रवाशाला शिस्तीचे धडे लावण्यास पुढे सरसावली. 


आज बस स्थानकावर एवढी मोठी गर्दी असताना सुद्धा राप प्रशासनाने कर्मचाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची बस स्थानकावर साधी उपस्थिती सुद्धा दिसून येत नव्हती. एसटी प्रशासनाने जर जादा बस गाड्या प्रत्येक मार्गावर सोडले असते तर हा अपघात झालाच नसता असा सूर प्रवाशातून निघत आहे.  


गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून कळंब बस स्थानकावर परीक्षा संपल्यामुळे प्रवाशांची तुफान गर्दी वाढली आहे. त्यातच कळंब  पोलिसांचा दरारा कमी झाला की काय असा प्रश्नही यावेळी प्रवाशातून उपस्थित केला जात आहे. कळंब बस स्थानकावर अनेक पाकिटेमार महिलांचे दागिने लांबपास करण्याची टोळी मोठ्या प्रमाणात सरसावलेली दिसत आहे. यामुळे प्रवाशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे पोलिसांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. असाच सूर प्रवाशातून जोर धरत आहे.


 
Top