धाराशिव (प्रतिनिधी)- ही निवडणूक गावकी किंवा भावकीच्या वादातील निवडणूक नाही. लोकसभा निवडणूक ही देशाची कारभार कोणाच्या हातात द्यायचा या विषयाची ही निवडणूक आहे. घराचा कारभारी जर चांगला असेल तर घरात सुख, शांती, समृध्दी लाभते. त्यामुळे या देशाचा कारभार नरेंद्र मोदी यांच्या हातात देण्यासाठी घड्याळाला मतदान करा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिवमध्ये केले.

महायुतीच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा प्रचंड शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज जिल्हा अधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आला. यानंतर झालेल्या जाहीर सभेत अनेक वक्त्यांनी विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यावर टिका केली. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जगात आपला देशाचा नावलौकिक झाला आहे. जपान सारखे देश आपल्याला अर्ध्या टक्क्यांनी कर्ज देवू लागले आहेत. आचार संहिता संपल्यानंतर सोयाबीनचा भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना त्यासाठी मदत करण्याचे ठरले आहे. 300 युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय ही घेण्यात येणार आहे. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्ग लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तरी पण गाफिल राहू नका. यावेळी अजित पवार यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांनी केलेल्या मुळ पवार आणि बाहेर आलेले पवार यांचा उल्लेख न करता गेल्या वेळेस आपण डॉ. पद्मसिंह पाटील यांना लोकसभेला निवडून दिले होते. यावेळेस सुन असलेल्या अर्चना पाटील यांना निवडून द्या. असे आवाहन करून काही लोक सुना बाहेरच्या आहेत असे समजू लागले आहेत. त्याला महिला बहिणींनी उत्तर द्यावे असे सांगितले. यावेळी पालकमंत्री तानाजी सावंत, क्रिडा मंत्री संजय बनसोडे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार राजाभाऊ राऊत, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, पाशा पटेल, सुरेश बिराजदार आदी उपस्थित होते. 


शिवसैनिक सहन करणार नाही

धाराशिव मतदारसंघ शिवसेनेचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क होता. या मतदारसंघातील शिवसैनिक कडवट शिवसैनिक आहे. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांनी एकत्र बसून या मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. असे आमचे मतदारसंघ कमी होत असतील तर शिवसैनिक शांत बसणार नाही. यावेळीस झालेले दुःख आम्ही सहन करून मोदी यांच्यासाठी काम करू असे पालकमंत्री सावंत यांनी इशारा देत सांगितले. 


अनेकांचा प्रवेश

काँग्रेसचे माजीमंत्री मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनिल चव्हाण, माजी नगराध्यक्ष संपत डोके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. धाराशिवचे माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, पाशा पटेल,  आमदार विक्रम काळे, आमदार राजाभाऊ राऊत, मंत्री संजय बनसोडे, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार अभिमन्यू पवार, आमदार राणाजगजितसिंह पाटील, उमेदवार अर्चना पाटील यांचेही भाषणे झाली. जिजामाता चौकातून भव्य शक्ती प्रदर्शन करत मिरवणुकीस सुरूवात झाली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उमेदवार अर्चना पाटील, राणाजगजितसिंह पाटील, पालकमंत्री तानाजी सावंत आदी उपस्थित होते. परंतु विदर्भात पंतप्रधान येणार असल्यामुळे बावणकुळे मध्येच निघून गेले. त्यानंतर पालकमंत्री सावंत ही निघून गेले. 


 
Top