उमरगा (प्रतिनिधी)-तालुक्यातील मुळज येथील श्री जटाशंकर तीर्थक्षेत्र यात्रा महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. यात्रा महोत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाज प्रबोधनपर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा महोत्सवाची देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

उमरगा तालुक्यातील मुळज येथे गावच्या पूर्वेला एक किमी अंतरावर उत्कृष्ट शिल्प कलेचा उत्तम नमुना असलेले प्राचीन हेमाडपंती जटाशंकर मंदिर आहे. प्राचीन काळापासून दरवर्षी जटाशंकर देवस्थानची यात्रा गुढीपाडवा ते हनुमान जयंती पर्यंत चालते. गुढीपाडव्याला सोयराप्पा घराण्याच्या काठी प्रतिष्ठापणेने यात्रेची सुरुवात होते. यात्रा काळात दररोज भजन कीर्तन आदींसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. तर उद्या मंगळवार, (दि.23) रोजी जटाशंकर देवस्थानची तीस ते चाळीस फुट उंच मानाची काठी व श्री च्या पालखीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात्रा  काळात ठराविक ठिकाणी दहीहंडी काला, भारूड, पोवाडे आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. यात्रेनिमीत्त मंदिराच्या संपूर्ण गाभार्यात विविध फळे, देशी, विदेशी सुगंधी सुंदर फुलानी मनमोहक आरास करण्यात आली आहे. मंदिर व परिसरात व गावातील सर्व मंदिर रंगकाम व विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहेत. बुधवारी दुपारी देवस्थान परिसरात जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे. यातील विजेत्या मल्लांना व्यवस्थापन समितीच्या वतीने रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. गुरुवारी पहाटे महाआरती व प्रसाद वाटपाने यात्रेची  सांगता होणार आहे. यात्रा महोत्सवातील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान व्यवस्थापन समिती, काठीचे मानकरी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

जटाशंकर देवस्थान यात्रेनिमित्त आज सोमवार (दि 22) रात्री आठ वाजता मंदिर परिसरात जटाशंकर संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या महोत्सवात प्रसिद्ध दिवंगत गायक पंडित जसराज यांचे शिष्य गोवा येथील प्रसिद्ध गायक पंडित सुरेश पत्की यांच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन व महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. मंदिर परिसरात मंगळवारी, (दि 23) रोजी पहाटे शोभेचे दारूकाम व छबीना, सकाळी अकरा वाजता गावांतून मानाची काठी व श्री ची पालखी मिरवणूक, बुधवारी, (दि 24) श्री छत्रपती शिवशंभो फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर, दुपारी नामवंत मल्लांच्या जंगी कुस्त्या, रात्री भारूडे, पहाटे महाआरती व प्रसाद वाटपाने यात्रा महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.


 
Top