धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पुरोगामी विचारवंत, वक्ते व पत्रकार रवींद्र केसकर यांच्यावर सोमवारी सायंकाळी 7.30 वाजता बेंबळी रोड येथे जीवघेणा हल्ला करून अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. यासंबंधी आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या धाराशिव शाखेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव येथील अंनिसचे कार्यकर्ते रवींद्र केसकर हे मागील अनेक वर्षांपासून संघटनेमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्यावर 1 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजता बेंबळी रोडवर पाच अज्ञात हल्लेखोरांनी गाडी अडवून धारदार शस्त्राने वार केला. तसेच त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी हल्लेखोरांनी त्यांची मोटारसायकल घेवून गेले. या घटनेत केसकर गंभीर जखमी झाले. या घटनेेचा अंनिसच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर जिल्हाध्यक्ष ॲड. देवीदास वडगावकर, चंद्रकांत उळेकर, विजय गायकवाड, शीतल वाघमारे यांची स्वाक्षरी आहे.


 
Top