भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात हिंदू धर्मामध्ये गुढी पाढव्याच्या सणाला अतिशय महत्व आहे. दसरा, दिवाळी व गुडीपाढवा आणि अक्षयतृतीया ही साडे तीन मुहूर्त अतिशय महत्वाची मानली जातात. या मुहूर्तापैकी एक असणाऱ्या गुडीपाढव्याच्या सणाला साडी, चोळी, तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या, उंच काठी या सर्वांसोबत साखरेचा हार ही अतिशय महत्वाचा आहे. पूर्वी ग्रामीण भागात साखरेचे हार बनविणारे कारागीर होते. मात्र ग्रामीण भागातील कारागिरांनी काम धंद्यासाठी आपला मोर्चा शहराकडे वळविला. त्यामुळे गुजरात राज्यातील साखरेचे हार विक्रीसाठी येत आहेत. तरीही भूम येथील साखरेच्या हाराला मोठी मागणी आहे.

भूम शहरात रेवडकर कुटुंब हे मागील तीन पिढ्यांपासून साखरेचे हार बनविण्याचा व्यवसाय करीत आहेत.त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यासह सोलापूर, लातूर, नगर, कल्याण, बीड, पुणे, मुंबई, बारामती या भागातून साखरेच्या हाराला मोठी मागणी आहे. मागणी जरी मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी साखर, दूध, गॅस व कामगाराच्या मजुरीत झालेली वाढ यामुळे म्हणावा तसा नफा या व्यवसायात राहिलेला नाही. हा व्यवसाय त्यांचे वडील सुभाष रेवडकर यांनी आपला शिक्षकी पेशा सांभाळण्याची कसरत करत आपला व्यवसाय सांभाळला. त्यांच्या निधनानंतर या कुटुंबाची तिसरी पिढी हेमंत रेवडकर, गणेश रेवडकर हे आपल्या आजोबा व वडिलांचा या व्यवसायाचा वारसा चालवत आहेत. 

त्यांना त्यांच्या आई सुरेखा व वैशाली रेवडकर या कामगारांसह साहित्य बनविण्यासाठी मेहनत घेत आहेत. सकाळी 06 वाजल्यापासून ते सायंकाळी 07 वाजेपर्यंत काम चालू असते. यावर्षी बाल गोपाळांच्या मागणीप्रमाणे व त्यांना आकर्षित कंगन हार बनवल्या आहे. सध्या ठोक भाव 70 ते 75 रुपये दर प्रति किलो आहे. किरकोळ दर 115 ते 120 रुपये प्रति किलो आहे. 



 
Top