धाराशिव (प्रतिनिधी)-घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोनवेळा काँग्रेसने निवडणुकीत पराभूत केले. त्याच काँग्रेसने आतापर्यंत ऐंशीवेळा राज्यघटनेत बदल केले आणि आता महायुतीचे सरकार संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार महाविकास आघाडी करत सुटली आहे. जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना आता घरी बसवा आणि महायुतीला विजयी करून मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी केले.

शुक्रवारी धाराशिव येथे महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिता कांबळे व महायुतीतील महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ म्हणाल्या की, जातपात, धर्म आपला किंवा विरोधक, असा कोणताही भेदभाव न करता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला कोव्हिड-19 काळात वाचविण्यासाठी रात्रंदिवस काम केले. मोदींनी मुस्लिम महिलांच्या सन्मानार्थ तीन तलाकसारखा कायदा केला. मुस्लिम समाजाच्या विकासासाठी अनेक योजना आणि विशेष निधी देवून त्यांच्या विकासासाठी मोदींनी प्रभावी काम केले. अल्पसंख्यांक समाजातील पदवीधारकांना अर्थसहाय्य, विवाहासाठी अर्थसहाय्य, उच्च शिक्षण, परदेशात शिक्षण यासह हजसाठी जाणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे कोणताही भेदभाव न करता राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रविकासात स्वतःला वाहून घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या विजयासाठी घड्याळ चिन्हाला आपले अमूल्य मत देवून त्यांना विजयी करावे, असे आवाहन चित्राताई वाघ यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी आभार व्यक्त केले.


 
Top