कळंब (प्रतिनिधी)- मोदींनी दिलेला शब्द म्हणजे विकासाची गॅरंटी आहे. त्यामुळे यापुढील काळात देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास मोहिमेत आपल्याला समर्थन देवून सहभाग घ्यावा, अशी साद महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चना पाटील यांनी मतदारांना घातली.

कळंब तालुक्यातील जवळा येथील गाठभेटीदरम्यान अर्चना पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे जुने कार्यकर्ते दिवंगत साहेबराव पवार गुरूजी यांच्या निवासस्थानी भेट देवून त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यानंतर पार पडलेल्या प्रचार सभेत त्या म्हणाल्या की, धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी घड्याळ चिन्हाला मत म्हणजे विकासाला मत आहे. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत, औशाचे आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री बसवराज  पाटील यांच्या प्रयत्नांतून प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचा सर्वांगीण विकास होत आहे. गतिमान विकासात खंड पडणार नाही, याची मतदारांनी जाणीव ठेवून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा देशात महायुतीची सत्ता आणण्यासाठी मतदारांनी आपल्याला समर्थन द्यावे, असे आवाहन उमेदवार अर्चना पाटील यांनी केले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव माकोडे यांनीही महायुतीच्या उमेदवारास निवडून देत आपल्या भागाचा विकास साधावा असे आवाहन केले. या प्रचार सभेस महायुतीचे रामहरी शिंदे, दत्तात्रय साळुंके, किरण पाटील, बाळासाहेब पवार, सचिन पवार, वैभव पवार यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top