धाराशिव (प्रतिनिधी)- महायुतीच्यावतीने राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवार म्हणून अजित पवार गटाच्या अर्चना पाटील या उभ्या आहेत. तर महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर उभे आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात या दोन प्रमुख उमेदवारांमध्येच मुख्य लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांनी फार्म भरताना दाखविलेल्या आपल्या संपत्ती विवरणा वरून दोन्ही उमेदवार करोडपती असल्याचे दिसून येत आहे.


ओम राजेनिंबाळकर यांच्या संपत्ती पाच वर्षात वाढ

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांच्या संपत्तीत मागील पाच वर्षात दोन कोटी 57 लाख रूपयांची वाढ झाली आहे. तर पत्नीच्या संपत्तीत 35.43 लाखाची घट झाली आहे. राजेनिंबाळकर यांच्या कुटुंबाकडे 41 तोळे सोने असून दोन चारचाकी तर एक दुचाकी आहे. विशेष म्हणजे 2019 मध्ये आमराजे यांना 73 लाख रूपयांचे कर्ज होते. त्यापैकी आता फक्त त्यांच्याकडे अडीच लाख रूपयांचे कर्ज असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. ओमराजे निंबाळकर यांच्याकडे बीई (इन्फॉर्मेशन टेक्नालॉजी) पदवी आहे. 2019 च्या शपथपत्रानुसार ओमराजे यांच्यावर चार गुन्हे दाखल होते. त्यापैकी आता फक्त दोन गुन्हे दाखल आहेत. राजेनिंबाळकर कुटुंबाकडे 45 एकर जमीन असून, पुणे व पवई येथे स्वतःचा प्लॉट आहे. या दोन्ही प्लॅटची किंमत एक कोटी 65 लाख इतकी दाखवली आहे.


अर्चनाताई पाटील यांच्याकडे साडेतीन किलोंचे दागिने

महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याकडे एकही चारचाकी वाहन नाही. पण त्यांच्याकडे साडेतीन किलो (3600 ग्रॅम) सोन्याचे दागिने आहेत. पती व त्यांच्याकडे असलेल्या दागिन्यांची एकूण किंमत पावणेतीन कोटी रूपये आहे. अर्चना पाटील या सुध्दा इंजिनिअर असून, इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशची पदवी घेतली आहे. उमेदवार पाटील यांना 68 लाख 36 हजार रूपये तर राणा पाटील यांच्याकडे सहा कोटी 25 हजार रूपयांची कर्जे आहेत. यामध्ये 50 लाख 26 हजार रूपये शासकीय देणी आहेत.


 
Top