धाराशिव (प्रतिनिधी)-विद्यापीठ नामांतर चळवळीच्या काळामध्ये नामांतराला विरोध असताना आपल्या संस्थेच्या वतीने पाडोळी (आ.) येथे सुरू करण्यात आलेल्या प्राथमिक विद्यालयास महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन अनोखे अभिवादन गुंड परिवारच्या वतीने करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकरराव गुंड गुरुजी यांनी या आठवणींना उजाळा दिला.

श्री.गुंड गुरुजी सांगतात, सन 1992-93च्या काळात मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीने मराठवाड्यात मोठा जोर धरला होता. गावागावात आंदोलने तर अनेक ठिकाणी जाळपोळ अशा घटनांमुळे वातावरण अधिक तप्त झाले. मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास एका गटाकडून मोठा विरोध होत होता. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले. हिंसक घटनांमुळे यात अधिकच भर पडत गेली.  विशेषतः ग्रामीण भागात तर आंदोलन अधिक हिंसक बनले. 

याच कालावधीत पाडोळी (आ.) येथे सुधाकर गुंड गुरुजी व विद्यमान भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड या भावंडांनी स्थापन केलेल्या जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळा मार्फत प्राथमिक विद्यालय सुरु केले. विशेष म्हणजे मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास विरोध होत असताना गुंड कुटुंबीयांनी सुरु केलेल्या प्राथमिक शाळेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन महामानवास अनोखे अभिवादन केले. 


 
Top