परंडा (प्रतिनिधी) - शहरात मुस्लिम धर्मियांची पवित्र ईद उल फित्र अर्थात रमजान ईद गुरुवारी दि.11 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्त हजारो मुस्लिम बांधवांकडून ईदगाह व विविध भागातील मस्जिदी मधून सामूहिक नमाज पठण कारण्यात आली. सकाळी 9 वाजता शहरातील ईदगाह मैदानासह शहरातल्या विविध मशिदी मधून सामूहिक नमाज पठण करण्यास सुरवात झाली.

रमजान ईद उपवासाच्या माध्यमातून महिनाभर अल्लाहची साधना केल्यानंतर आलेले आनंदाचे पर्व तालुक्यात ठिकठिकाणी ईदचा सण हा आनंद, उत्साहात साजरा करण्यात आला. राजकीय नेतेमंडळींपासून ते सर्वसामान्य नागरिकांनी ईदच्या या पर्वात सहभागी होत मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यासह मुस्लीम बांधवांनीही ईदची दुआ करताना सर्वांना सुख समाधाना मिळण्यासह सलोख्यात वाढ व्हावी, अशी दुआ अल्लाहकडे मागितली. शहरातील परांडा करमाळा राज्य मार्गावरील ईदगाह येथे हजारो मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज अदा करण्यात आली. नमाज नंतर सर्व भारतीयांसाठी दुवा करण्यात आली. ईदगाह या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, तहसीलदार घनश्याम अडसूळ, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी मुस्लिम धर्मियांना गुलाब पुष्प देवून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी प्रसिद्ध सर्व धर्मीय सुफीसंत हजरत ख्वॉजा बदरोद्दीन दर्गाह येथे उपस्थित राहून मुस्लीम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दर्गाह येथे जमलेल्या सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या.


 
Top