धाराशिव  (प्रतिनिधी)- 12 एप्रिल 2024 पासून 40 - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात होणार आहे. याचाच एक भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कक्षात नामनिर्देशनपत्राच्या अनुषंगाने प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे,पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील,तहसीलदार (महसूल) प्रवीण पांडे व नायब तहसीलदार (निवडणूक) प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे व इतर अधिकाऱ्यांनी यावेळी नामनिर्देशन पत्राच्या अनुषंगाने स्थापित करण्यात आलेल्या उमेदवारांचे फोटो,फोटोचे घोषणापत्र स्वीकारणे व निदेश पुस्तिका,खर्चाचे पुस्तक उपलब्ध करून देण्याबाबतच्या कक्षाला भेट देऊन या कक्षाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामकाजाची माहिती संबंधित कक्षाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतली.तसेच नामनिर्देशनपत्राची प्राथमिक तपासणी कक्ष,नामनिर्देशनपत्र दैनंदिन अहवाल कक्ष,अनामत रक्कम जमा करणे कक्ष,मतदार यादी कक्ष व कोरे नामनिर्देशन अर्ज,शपथपत्र व इतर नमुने उपलब्धता कक्षाला भेट देऊन माहिती घेतली.या कक्षाकडे नामनिर्देशनपत्र सादर करताना लागणारे विविध अर्जाच्या नमुन्यांची पाहणी करून संबंधित कर्मचाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन केले. 

प्रात्यक्षिकाच्या सादरीकरणातून नामनिर्देशनपत्र वितरित करणे, अनामत रक्कम जमा करून घेणे, भरण्यात आलेले अर्ज तपासणे व या अर्जामध्ये किंवा शपथपत्रामध्ये असलेला त्रुटी संबंधित उमेदवारास कळविणे,नामनिर्देशनपत्र भरल्यानंतर उमेदवारास द्यावयाची कागदपत्रे, उमेदवाराकडून घ्यावयाची आवश्यक कागदपत्रे याबाबतचे  सादरीकरण यावेळी करण्यात आले. संबंधित कक्षाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


 
Top