धाराशिव (प्रतिनिधी)-बोधिसत्त्व, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने शनिवार, दि.20 एप्रिल रोजी सायंकाळी धाराशिव शहरातून भव्यदिव्य मिरणूक काढण्यात आली. पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीची गेल्या 30 वर्षापासूनची परंपरा यावर्षीही समितीच्या वतीने जोपासली आहे. भर पावसातही जिल्हाभरातील भीमसैनिकांसह सर्वधर्मीय समाजबांधवानी मोठ्या उत्साहात मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला.

शहरातील भीमनगरमधील क्रांती चौक येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी, जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक तथा डीएस ग्रुपचे संस्थापक धनंजय शिंगाडे, समितीचे अध्यक्ष ॲड. परवेज काझी, कार्याध्यक्ष सतीश कदम, उपाध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे, सतीश ओहाळ, सचिव कृष्णा भोसले, सहसचिव रवी कोरे, कोषाध्यक्ष विशाल शिंगाडे, सल्लागार राजाभाऊ बागल, भाऊसाहेब उंबरे, नंदकुमार शेटे, सुभाष पवार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी जयंती उत्सव समितीचे मिरवणूक रावसाहेब शिंगाडे, जैनुद्दीन मुजावर, सांस्कृतिक विभागप्रमुख ईश्वर इंगळे, योगेश वाघमारे, सागर चव्हाण, बापू साबळे, विजय उंबरे, संरक्षण समिती प्रमुख प्रसेनजित शिंगाडे, महेश शिंगाडे, समीर शेख, प्रसिद्धी प्रमुख यशवंत शिंगाडे, धम्मपाल कांबळे, सारीपुत शिंगाडे, सत्यजित माने, अजय शिंगाडे यांच्यासह युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

मिरवणुकीचे यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील पारंपारिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये कर्नाटकमधील उडपी, हैद्राबाद येथील मरफा, बारामती, देवगड येथील बॅन्डपथक, शंकरनगर येथील बॅन्जो पथक यासह हलगी, संबळ, कोल्हापूरची कडकणी अशा पारंपारिक वाद्य पथकांचा समावेश होता. विशेष म्हणजे मिरवणूक सुरु असतानाच पावसाचेही आगमन झाले. तरी युवकांचा उत्साह कायम होता. पावसाचा व्यत्यय आला तरी पोलीस प्रशासनाच्या नियमांचे आणि वेळेचे बंधन पाळून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन दहा वाजता मिरवणुकीची सांगता करण्यात आली. अतिशय शिस्तीमध्ये निघालेल्या या मिरवणुकीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.


 
Top