धाराशिव (प्रतिनिधी)-1991 साली येथे मंजूर झालेले मेडिकल कॉलेज मुंबईला नेले असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. विरोधकांनी धाराशिव येथे मंजूर झालेले मेडिकल कॉलेज मुंबईला नेले यांचे पुरावे द्यावेत. मी राजकारण सोडून देतो. विरोधक नौटंकी करत खोटे, नाटे आरोप करीत आहेत व लोकांची दिशाभूल करीत आहेत. यापुढे विरोधकांनी असा प्रकारे खोटे आरोप केल्यास फौजदारी खटका दाखल करणार असल्याची माहिती भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

रविवार दि. 21 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महात्मा फुले आरोग्यदायी योजनेबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपाचे खंडन केले. आमदार पाटील यांनी तेरणा मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये अनेकांवर उपचार आतापर्यंत केले आहेत. शासकीय योजनेत फक्त 27 हजार रूपयांचा उपचार बसतो. उरलेले 73 हजार रूपये हे तेरणा मेडिकल कॉलेज खर्च करते. शस्त्रक्रिया आणि उपचार वेगवेगळे आहेत. हे विरोधकांना माहिती नाही. आता पर्यंत जिल्ह्यातील लोकांच्या उपचारासाठी तेरणा ट्रस्टच्यावतीने 48 कोटी रूपये खर्च केला आहे. विरोधक अर्धवट माहितीच्या अधारे बेताल आरोप करीत आहेत. लोकांची सेवा करण्याचे काम तेरणा ट्रस्टतर्फे आम्ही करीत आहोत. वास्तव जनतेसमोर मांडावे. निवडणूक आली म्हणजे काहीही आरोप करू नयेत. पाच वर्षात खासदार म्हणून काय काम केले? ते सांगा. कामावर मते मागावित. असेही आमदार पाटील म्हणाले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे उपस्थित होते.


 
Top