धाराशिव (प्रतिनिधी)-येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतर्गत प्रतिनियुक्तीवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी कास्ट्राईब राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघ (कॅग्मो) च्या वतीने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतर्गत प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मागील तीन वर्षापासून अधिष्ठाता यांच्याकडून सापत्न वागणूक देऊन अन्याय करण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अपघात विभागात 7 पदे भरलेली असताना निरर्थक कारणे देऊन त्यांची नियुक्ती ज्या अपघात विभागात करुन काम करणे अपेक्षित असताना त्यांना इतर कामे लावून डीएचएसअंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सीएमओ/डीएमओ कर्तव्यपाळी करण्यासाठी भाग पाडले जात आहे.

वास्तविक सीएमओ यांनी सीएमओचीच कामे केली पाहिजे, मात्र त्यांना बाजूला करुन प्रशासन वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्पेशालिटीची कामे करुन सीएमओ/डीएमओ कर्तव्यपाळी करण्यास भाग पाडत आहे. तरील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सीएमओ/डीएमओ कर्तव्यपाळी तत्काळ बंद करण्यासाठी आयुक्तांनी संचालक स्तरावरुन आदेशित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत न्यायवैद्यक शास्त्र विभाग कार्यरत असून आजपर्यंत त्यांनी पोस्टमार्टेम साठी पदभार घेतलेला नाही. निरर्थक कारणे देऊन डीएमओ यांना पोस्टमार्टेम करण्यासाठी भाग पाडले जात आहे. तरी त्यांना तत्काळ हस्तांतरण घेण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोर्ट कॉलला हजर राहाणे, सोनोग्राफी/गर्भपात केंद्राची तपासणी करणे, तुळजापूर व येरमाळा यात्रा कर्तव्यपाळी, पंढरपूर यात्रा कर्तव्यपाळी, विविध आरोग्य शिबिरे, अतिमहत्त्वाच्या नेतेमंडळींच्या कर्तव्यपाळी, शासकीय रुग्णालयातील बैठका अशा सर्व कामाच्या अतिताणामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. दत्ता तपसे, मुख्य सचिव डॉ.नितीन मोरे, कार्याध्यक्ष डॉ.निलेश भालेराव, उपाध्यक्ष डॉ.सचिन बालकुंद, प्रसिद्धी सचिव डॉ.प्रवीण इंगळे, राज्रू प्रवक्ते डॉ.एम.एम. बागवान, राज्य सचिव डॉ.संदेश यमलवाड आदींची स्वाक्षरी आहे.  


 
Top