तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील श्रीक्षेत्र तामलवाडी येथे श्रीगुरू देहूकर सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने गुढी पाडव्यापासून (दि. 9) सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या उत्साहात आरंभ झाला होता. दि. 16 एप्रिल रोजी श्रीगुरू बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाने या सप्ताहाची उत्साहात सांगता झाली.

पहिल्या दिवसांपासून आजपर्यंत राज्यातील नामवंत कीर्तनकारांनी या नगरीत कीर्तनसेवा केल्याने तामलवाडीसह अवघी पंचक्रोशी अक्षरश: भक्तीसागरातच डुंबून निघाली. इतकेच नाहीतर या कालावधीत धाराशिव व सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या काही भागातील भाविकांनी हजेरी लावून कीर्तन श्रवणात मंत्रमुग्ध होत आपल्या जीवनाच्या पुण्याईत मोलाची भर घातली. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज श्रीगुरू वै. सोपानकाका महाराज देहूकर, श्रीगुरू वै. ज्ञानेश्वर माऊली महाराज देहूकर यांच्या कृपा आशीर्वादाने आणि श्रीगुरू बापूसाहेब देहूकर (पंढरपूर) यांच्या प्रेरणेने, श्रीगुरू कान्होबा महाराज देहूकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य अशा सप्ताहाचे आयोजन या नगरीत करण्यात आले होते. या सप्ताह सोहळ्यात श्रीगुरू बाळासाहेब महाराज देहूकर (पंढरपूर), हभप उमेश महाराज दशरथे (मानवत), हभप पांडुरंग महाराज घुले (श्रीक्षेत्र देहू), हभप चैतन्य महाराज देगलूरकर (पंढरपूर), हभप एकनाथ महाराज सदगीर (ठाणे), हभप आचार्य रामकृष्ण महाराज लहवीतकर, श्रीगुरू कान्होबा महाराज देहूकर आणि श्रीगुरू बापूसाहेब महाराज देहूकर यांची संकीर्तन सेवा पडली आहे.

या उपस्थित महाराजांनी मराठवाड्यातील एक उत्तम आध्यात्मिक केंद्र म्हणून तामलवाडी सगळीकडे परिचित असल्याचे आवर्जुन सांगितले. या भाविकांनी आत्मिक समाधानासाठी संतांच्या संगतीत सतत राहावं, संतांच्या संगतीत जीवनाचा उध्दार आहे, संतांचा महिमा खूप मोठा आहे, संगतीवर विचार अवलंबून आहेत; यामुळे भावी पिढीने कायम चांगल्यांची संगत करण्याचेही आवाहन केले. मंगळवारी काल्याचे कीर्तन श्रीगुरू बापूसाहेब महाराज देहूकर यांचे होऊन या नयनरम्य अशा सुवर्ण महोत्सवी सप्ताहाची सांगता झाली.


विशेष योगदान दिलेल्या संस्था, नागरिकांचा गौरव

या सोहळ्यात विशेष योगदान दिलेल्या बालाजी अमाईन्स, लोकमंगल फाऊंडेशन, दत्तात्रय वडणे, गंगाधर घोटकर, तुळजाई पार्क, अविनाश गायकवाड, संतोष जाधव, नानासाहेब पाटील व त्यांच्या धर्मपत्नी छबाबाई पाटील, भाऊसाहेब पाटील, अनिल पाटील, रामेश्वर खराडे, सर्जेराव गायकवाड, शाहीर गायकवाड, बंडू पाटील, अप्पूराजे गवळी, श्रीकांत गायकवाड, दाजीबा चव्हाण, गहिनीनाथ पाटेकर, जगतसिंह ठाकूर आदींसह इतर व्यक्तींचाही सत्कार श्रीगुरू कान्होबा महाराज देहूकर यांच्या हस्ते करण्यात आला.



 
Top