उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील मुळज येथील ग्रामदैवत श्री जटाशंकर देवस्थानच्या यात्रेनिमित्त मंगळवारी शिव-पार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात सर्व जाती धर्मातील हजारो वऱ्हाडी भाविक उपस्थिती होती.

सीमावर्ती भागांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुळज ता. उमरगा येथे प्राचीन उत्कृष्ट शिल्प कलेचा उत्तम नमुना असलेले जागृत श्री जटाशंकर हेमाडपंती मंदिर आहे. दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने प्राचीन काळापासून सर्व धर्म समभाव, सामाजिक एकोपा तसेच राष्ट्रीय एकात्मता जोपासत सुरू असलेला विवाह सोहळा साजरा करण्याची परंपरा ग्रामस्थ आजही मोठय़ा भक्ती भावाने जोपासत आहेत. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी मराठी महिन्यात चैत्र शुद्ध अष्टमीला वेदमूर्ती अशोक जोशी यांच्या पौरोहित्याखाली वेदमंत्रोच्चार, विधिवत धार्मिक पुजा, मंगलाष्टके व अक्षता टाकण्यात आल्या. 

त्यानंतर पाठक दाम्पत्यांनी पार्वतीचे कन्यादान केले. यावेळी जिपचे माजी सभापती अभय चालुक्य, सुनिता वडदरे, सतिश जाधव, सुधाकर चव्हाण, दिगंबर बिराजदार, सुनिल कुलकर्णी, वैशाली कुलकर्णी, दत्तात्रय कुलकर्णी, व्यंकट पाठक, निखिल नितीन कुलकर्णी, संतोष पाठक, गोपाळ जोशी आदींसह भाविक. मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोहळा यशस्वीतेसाठी देवस्थान व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. 


पाठक दाम्पत्यांला कन्यादानाचा मान

प्राचीन काळापासून चालत आलेल्या जटाशंकर मंदिरातील शिव पार्वती विवाह सोहोळ्यात पाठक दाम्पत्यांना कन्यादानाचा मान आहे. अरूण व सविता पाठक या दाम्पत्यांनी परंपरेनुसार विधीवत पार्वतीचे कन्यादान केले.


भाविकांना महाप्रसाद वाटप

सध्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मंदिर परिसरात यावर्षी कै गणपत जोशी यांच्या स्मरणार्थ श्रीमती दिपाली कुलकर्णी, पुणे येथील महादेव चव्हाण, निखिल नितीन कुलकर्णी, दत्ता बिराजदार, भास्कर कोकळे, मधुकर जमादार आदिच्या वतीने भव्य शामियाना मंडपाची उभारणी करून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


 
Top