तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील जळकोट येथील सेवानिवृत्त भारतीय सैन्य दलातील माजी ऑर्डनरी कॅप्टन बाबुराव तात्याराव जाधव72  यांचे प्रदीर्घ आजाराने बुधवार दुपारी 3:30 वाजता दुःखद निधन झाले. 

त्यांच्या पार्थिवावर गुरुवार दिनांक 25  रोजी सकाळी 10  वाजता जळकोट येथे  ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील हजारो जनसमुदायांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पुर्वी जळकोटसह परगावाहून आलेल्या माजी सैनिकांनी सैन्यदलाच्या पद्धतीने शिस्तबध्दपणे पुष्पचक्र अर्पण करण्यात येऊन अखेरची सलामी देण्यात आली. यावेळी भारत माता की जय, अमर रहे अमर रहे बाबुराव जाधव अमर रहे आदी घोषणा देण्यात आल्या. यामध्ये माजी सैनिक विठ्ठल लोखंडे, माजी सैनिक तथा नळदुर्ग पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार भारत पाठक, बळीराम सावंत, यशवंत कदम, प्रकाश कदम, सूर्यकांत सुरवसे, पुंडलिक भोगे, अंकुश लोखंडे, ज्ञानदेव सगर, हरी कदम ( वाडीकर ), कुमार मोरे, विठ्ठल भालेराव, तुकाराम कदम, विठ्ठल भोगे, प्रभाकर सुतार आदींसह मराठा ग्रुपचे जवळपास 25 ते 30 माजी सैनिक उपस्थित होते. बाबुराव तात्याराव जाधव यांनी 32 वर्षे भारतीय सैन्यदलात सेवा केली आहे. बाबुराव जाधव हे ऑर्डनरी कॅप्टन पदापर्यंत जाणारे जळकोट व परिसरातील एकमेव सैनिक होते. त्यांचा कारगिल युद्धामध्ये सहभाग होता. त्यामुळे त्यांना “ कारगिल योध्दा “ असे सन्मामाने बोलले जात होते. त्यांना सेवा कालावधीमध्ये उत्कृष्ट धाडसी कामगिरीबद्दल अनेक पदके प्राप्त झाली आहेत. बाबुराव जाधव यांनी आपल्या सेवा कालावधीमध्ये अनेक नवतरूणांना भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रोत्साहित करून सैन्यामध्ये सामिल केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली, सूना, जावाई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्यांच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


 
Top