कळंब (प्रतिनिधी) - तालुक्यातील येरमाळा  येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेची सांगता दि. 27 रोजी  रविवार रोजी घुगरी महाप्रसादाच्या वाटपाने झाली. गेले पाच दिवस श्री येडेश्वरी देवीचीची पालखी चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त आमराई पालखी मंदिरात मुक्कामी होती. पाचव्या दिवशी घुगरीच्या महाप्रसाद वाटपाचे आयोजन असते. यानंतर देवीच्या पालखीचे मुख्य मंदिराकडे प्रस्थान झाले.

सलग पाच दिवस चालू असलेल्या या यात्रेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चुना वेचण्याच्या कार्यक्रमासाठी चुन्याच्या रानात पालखी आल्यानंतर पंधरा लाखांहून अधिक संख्येने उपस्थित राहून भाविकांनी पालखी वर चुनखडी टाकली. तेथून पालखी आमराई मंदिरात आल्यानंतर पालखीचा मुक्काम पाच दिवस असतो. या काळात भाविक मोठ्या संख्येने पालखीच्या दर्शनासाठी गर्दी होती. यात्रेचा शेवट दिवस असल्याने भाविकांनी पालखी दर्शनासह घुगरी प्रसादासाठी गर्दी केली होती. शेवटच्या दिवशी गावातील घरोघरी जाऊन रब्बी हंगामातील नवीन ज्वारी, गहू, हरभरा जमा केलेल्या धान्यातून घुगरी महाप्रसाद तयार करुन घुगरीचे वाटप केला जातो. यामध्ये भाविक आपल्या भावनेनुसार घुगरी मध्ये मनुके, बदाम, काजू, गूळ, साखर ही टाकतात.

चार वाजता आमराई मंदिरात देवीच्या पालखीची आरती महापूजा करुन घुगरी प्रसादाचे पुजारी,मानकरी,ग्राम पंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते घूगरी प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता करण्यात आली. या घुगरी प्रसादासाठी अनेक जिल्ह्यातून भाविक आले होते.



 
Top