धाराशिव (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील कौडगाव आणि तुळजापूर तालुक्यातील तामलवाडीप्रमाणे उमरगा, लोहारा परिसरातही मोठे औद्योगिक प्रकल्प उभारून तरूणांच्या हाताला काम देण्याचा संकल्प महायुतीने केला आहे. त्यामुळे आगामी काळात सत्तेत असलेल्या महायुतीलाच मतदारांनी पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन माजी मंत्री बसवराज पाटील यांनी केले.

महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी जेवळी, सास्तूर येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी यावेळी माजी मंत्री बसवराज पाटील, माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, सुरेश बिराजदार, जितेंद्र शिंदे, मोहन पणुरे, अभय चालुक्य, राहुल पाटील सास्तूरकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी मंत्री पाटील म्हणाले की, आपल्या जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करता यावा, मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी आपल्या हक्काचा खासदार असणे आवश्यक आहे. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी 40 वर्षांत विकासाची कामे केली आहेत. 21 टीएमसी. पाण्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. म्हणूनच आपल्या दुष्काळी भागाला पाणी मिळणार आहे. आणखी मोठे उद्योग आपल्या भागात आणायचे आहेत, त्यासाठी तामलवाडी, कौडगाव या ठिकाणी नवे प्रकल्प उभे राहत असल्याचे ते म्हणाले. जेवळी व सास्तूर येथील प्रचारसभेस महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


 
Top