धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयच्या  यंत्र अभियांत्रिकी  विभागात कार्यरत असलेले प्रा. प्रशांत हरिश्चंद्र जैन यांना छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठने नुकतीच पीएच.डी. प्रदान केली. 

 प्रा. प्रशांत जैन यांनी “डायग्नोसीस ऑफ फॉल्ट्स इन अँटीफ्रक्शन बीयरिंग्ज युजींग व्हायब्रेशन सिग्नल अनालिसीस“ या प्रिडिक्टीव मेन्टेनन्स क्षेत्रातील महत्वाच्या विषयावर आपला प्रबंध सादर केला. त्यांना एमआयटी छत्रपती संभाजीनगरचे संचालक प्रा. डॉ. एस. पी. भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

अभियांत्रिक क्षेत्रात प्रा. प्रशांत जैन यांनी यापूर्वीही अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले शोधनिबंध सादर केले असून प्रा. प्रशांत जैन यांनी त्यांच्या पीएच.डी. दरम्यान त्यांच्या संशोधन विषयावर 10 पेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित केले आहेत, त्यापैकी 6 शोधनिबंध सुप्रसिद्ध स्कोपस इंडेक्स्ड जर्नल्स आणि वेब ऑफ सायन्स इंडेक्स्ड जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणजे, प्रा. प्रशांत जैन हे अभियांत्रिकी विषयांच्या 4 पुस्तकांचे लेखक असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या पुस्तकाचे चांगले स्वागत केलेले आहे.  

पीएच.डी. प्राप्त केल्याबदल डॉ. प्रशांत जैन यांचा सत्कार मा. राणाजगजितसिंहजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी आमदार पाटील म्हणाले की अभियांत्रिकी सारख्या क्षेत्रांमध्ये प्रा.जैन यांनी डॉक्टरेट मिळविली असून ही अभिमानाची गोष्ट आहे. प्रा. जैन यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसाठी करावा. यावेळी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, प्रा. ज्ञानराज निंबाळकर, प्रा. जयेश कदम, प्रा. शिवाजी बिरादार, प्रा. सुनील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यावेळी बोलताना म्हणाले की, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये  उच्चविद्याविभूषित डॉक्टरेट स्टाफ असल्यामुळे विद्यार्थी पदवी बरोबरच आपल्यातील कला कौशल्य विकसित करत असून याचा उपयोग जास्तीत जास्त  संशोधन आणि प्लेसमेंट साठी होत आहे. याप्रसंगी डॉ. प्रशांत जैन यांचे डॉ. पद्मसिंह पाटील,  राणाजगजितसिंह पाटील, अर्चनाताई पाटील, मल्हार  पाटील, मेघ पाटील व प्रा. गणेश भातलवंडे यांनी अभिनंदन केले. तसेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी यांनीही अभिनंदन केले.


 
Top