धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कोणासही वेळ नाही. सर्वच राजकीय पक्ष एकमेकांचे हेवे-दावे काढण्यातच मशगुल आहेत. त्यातच जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपिटेमुळे शेतकऱ्यांचे आंबा तसेच इतर फळबागांचेही प्रचंड नुकसान झालेले आहे .अगोदरच शेतकरी संकटात असताना पुन्हा त्यांच्यावर नैसर्गिक आपत्तीमुळे कुराड कोसळली आहे .शेतकऱ्यांना गुरेढोरे जगवणे सुद्धा मुश्किल झाले आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची प्रचंड वित्तहानी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांचे व फळबागांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.