तुळजापूर (प्रतिनिधी)-महिनाभर रोजे करून सश्रध्द भावनेने अल्लाहची ‌‘इबादत' केल्यानंतर गुरुवारी तुळजापूर शहरात मुस्लिम बांधवांनी ईद-ऊल-फितर (रमजान ईद) उत्साही, आनंदी आणि मंगलमय वातावरणात साजरी केली. हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छांचा वर्षांव केला. दिवसभर घरोघरी शिरखुम्र्याचा आस्वाद घेत सर्वानी ईदचा आनंद घेतला. तुळजापूर शहरात मुस्लिम बांधवांनी गुरुवार (दि. 11) रोजी ईद-ऊल-फितर (रमजान ईद) सकाळी 9.30 मि. वाजता ईदगाह मैदानात नमाज अदा करण्यात आली.

गेले महिनाभर रमजानचे रोजे करून मुस्लिम कुटुंबीयांनी अल्लाह व त्यांचे प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी श्रध्दा प्रकट केली. महिनाभर प्रार्थना व नमाज पठणात मग्न झाल्यानंतर संपूर्ण महिन्याचे रोजे कसे संपले हे कळले सुध्दा नाही. शेवटी रमजान ईदचे वेध लागले तेव्हा या पवित्र महिन्याला निरोप देताना सर्वाच्या भावना उचंबळून आल्या होत्या. बुधवारी (दि. 10) रोजी सायंकाळी चंद्रदर्शन होताच ‌‘ईद का चाँद मुबारक' म्हणून एकमेकांना शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. ईदच्या दिवशी सकाळी ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून व अत्तर लावून प्रसन्न चित्ताने नमाजासाठी एकत्र आले. 

गुरुवारी सकाळी घाटशिळ रोडवरील ईदगाह मैदानावरती मौलाना बिलाल रजा व मौलाना गुलाम मोहम्मद यांनी  रमजान महिन्याचे महत्व सांगितले. ईदगाह मैदानावरती सकाळी 09.30 वाजता मौलाना बिलाल रजा महत्व सांगितले.

यावेळी, हजारो मुस्लीम बांधवांनी खांद्याला खांदा लावून, एका रांगेमध्ये एकत्रीतपणे ईद-ऊल-फितर (रमजान ईद) ची नमाज अदा केली. नमाजनंतर सर्व नागरीकांच्या सुख-समृध्दीसाठी, देशात व जगात सुख व शांती नांदू दे, बेरोजगारांना रोजगार मिळू दे,  अशी प्रार्थना करण्यात आली. गोरगरीब, अनाथ, भिक्षूक, विधवा, फकीर, यांना दानधर्म करण्यात आले. ऐपतदार कुटुंबीयांनी वार्षिक उत्पन्नातील ठराविक हिस्सा (जकात) गोरगरिबांना दिला. 

याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, खांडेकर आणि उपनिरीक्षक, रवि भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह मैदानावर  पोलीस बंदोबस्त ठेवण्यांत आला होता. शेवटी मौलाना बिलाल रजा व मौलाना गुलाम मोहम्मद यांनी युवा नेते विनोद गंगणे, नगर परिषद व पोलीस प्रशासनाचे आभार मानले.

नमाजनंतर ईदगाह मैदानावर हिंदू बांधव येऊन मुस्लीम बांधवांना गुलाब देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदनिमीत्त घरोघरी तयार करण्यात आलेल्या ‌‘शिरखुम्र्या' च्या मधुर आस्वादाने ईदचा गोडवा वाढविला. या आनंदामध्ये मुस्लिमांबरोबर हिंदू मित्र परिवारही सहभागी झाला होता. दिवसभर मुस्लिम बांधवांच्या घरी ईद मिलनाची रेलचेल चालू होती. दिवसभर तुळजापूर शहरातील हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवांना गळाभेट घेवून ईदच्या शुभेच्छा देत होते. 


विनोद गंगणे यांनी केली मंडपची व्यवस्था

यावर्षी उन्हाचा पारा चांगलाच वाढला होता, अशा कडक उन्हामध्ये ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून युवा नेते विनोद गंगणे यांच्या वतीने तात्पुरते भव्य असे मंडप मारण्यात आले होते. त्यामुळे समस्त मुस्लीम बांधवांना उन्हाचा त्रास जाणवला नाही. ईदगाह मैदानावरील भव्य  मंडपामुळे वातावरण भक्तीमय व प्रसन्नमय दिसत होते. ईदगाह कमिठी व समस्त मुस्लीम बांधवांनी विनोद गंगणे यांचे आभार मानले.


 
Top