धाराशिव (प्रतिनिधी)-भाजप ने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, पवार घराणे फोडले, काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न केला. असा या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली आहे. सत्ताधारी मात्र बेधुंद आहेत. असा या भाजपला या निवडणुकीत हद्दपार करा. लोकसभा 2024 ची निवडणूक फोडाफोडीच्या राजकारण्याच्या विरोधात ही निवडणूक आहे. मतदारांनी आपला संताप ईव्हीएम मशीन द्वारे मतदान करून व्यक्त करावा, असे आवाहन काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख यांनी केले.
मंगळवार दि. 16 एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार तथा ठाकरे गट शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी राजकारणातील यंग ब्रिगेड शिवसेनेचे माजीमंत्री अदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, हे अमित देशमुख सह उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे चौकातून निघालेली ही भव्य मिरवणूक शहराच्या विविध मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाजवळ आली. याठिकाणी जाहीर भाषण झाले. तिन्ही युवक नेत्यांनी ओम राजेनिंबाळकर यांच्या कर्तृत्व व नेतृत्वाचे तोंड भरून कौतुक केले.
यावेळी माजी आमदार राहुल मोटे, शिवसेनेचे शंकरराव बोरकर, काँग्रेसचे धीरज पाटील, प्रतापसिंह पाटील, खलील सय्यद, उमेश राजेनिंबाकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पवनराजे व विलासराव देशमुख नाते जपण्यासाठी
पुढे बोलताना अमित देशमुख यांनी ओम राजे यांचे वडील पवनराजे निंबाळकर व विलासराव देशमुख यांचे एक वेगळे नाते होते. हे चांगले नाते जपण्यासाठी आपण मुद्दाम उपस्थित राहिलो. असे सांगून धाराशिवचे मेडिकल कॉलेज आपण केले असून, काँग्रेसच्या कार्यकाळातच 21 टीएमसी पाणी, धाराशिव शहराला उजनीचे पाणी मिळाले असल्याचे सांगितले.
धाराशिवमध्ये गद्दार विरूध्द निष्ठावंत लढाई
आज ची भव्य मिरवणूक पाहून लोकांचा उत्साह पाहून ओम राजेनिंबाळकर यांच्यासाठी प्रचार सभेची गरज आहे असे मला वाटत नाही. असे म्हणत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघात केला. विरोधकांनी पक्ष फोडा, चिन्ह चोरले, अशा या भाजपला महाराष्ट्र साथ देणार नाही. हेच वातावरण पूर्ण देशात आहे. असे सांगून आदित्य ठाकरे यांनी आपकी बार भाजप तडीपार निश्चित होईल. देशात महागाई वाढली आहे. शेतकऱ्यांना मदत नाही, त्यामुळे सर्वत्र असंतोष दिसत आहे. येथील आमदार कैलास पाटील यांनी मिंदे यांच्या गाडीला लाथ मारून सेनेमध्ये राहिले. त्यामुळे ही लढाई गद्दार विरूध्द निष्ठावंत लढाई आहे असे आवाहन केले.
खेकड्याची नांगी ठेचा
पालकमंत्री यांच्या नावाचा उल्लेख न करता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राला भिकारी करणारा खेकडा प्रवृत्तीने साडेपाच हजार कोटीचा घोटाळा केला आहे. अशी टिका करत खेकडा सध्या नवीन मतदारसंघाच्या शोधात आहे. असे म्हणत पवार यांनी घणाघाती टिका केली. एका सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे 35 खासदार निवडून येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी मल्हार पाटील व अर्चनाताई पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचाही रोहित पवार यांनी समाचार घेतला.
आमदार कैलास पाटील कोसळले
भर कडक उन्हात ऐन दुपारी 42 अंश तापमान असताना आण्णाभाऊ साठे चौकातून भव्य शक्ती प्रदर्शन करत आमदार कैलास पाटील, आमदार रोहित पवार, प्रतापसिंह पाटील, खासदार ओम राजेनिंबाळकर हे भव्य मिरवणुकीने उमेदवारी अर्ज भरण्यास निघाले होते. शहरातील विविध मार्गावरून येत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आमदार कैलास पाटील यांना उष्मघाताचा त्रास होवून ते कोसळले. त्यानंतर त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.