धाराशिव (प्रतिनिधी)-येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय व उच्च व तंत्र शिक्षण विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ लोणेरे यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकताच स्कूल कनेक्ट कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी ग्रीनलँड शाळेतील विद्यार्थी व शिक्षक अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये आले होते.

महाविद्यालय तसेच विद्यापीठाच्या वातावरणाशी परिचित होण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी कॅम्पस टूर आणि संवादात्मक सत्र असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून यामध्ये शैक्षणिक कार्यक्रम, करिअरचे मार्गदर्शन, इंटरशिप आणि प्लेसमेंटच्या संधी बद्दल सर्व समावेशक माहिती विद्यार्थ्यांना देणे हा मुख्य हेतू आहे. तसेच विद्यार्थी कर्ज आणि आर्थिक साह्य याबद्दल विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी माहिती स्टॉल लावून बँकाशी सहयोग करणे सुद्धा या कार्यक्रमाच्या अंतर्गत अंतर्भूत असून यासाठी असलेली पात्रता, निकष ,विविध शिष्यवृत्ती  योजनांचा तपशील यामध्ये माहितीपूर्ण वितरित केला गेला.अशा पद्धतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी ग्रीनलँड शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते.

यावेळी तेरणा अभियांत्रिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना डॉ. माने म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत नाविन्यपूर्ण अशी विद्यापीठाची संकल्पना असून विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेश घेण्यापूर्वीच करिअरच्या असलेल्या अनेक संधी, त्याचबरोबर आर्थिक नियोजन करण्यासाठी सुद्धा ज्या अनेक स्कीम आहेत त्याविषयीची सुद्धा माहिती विद्यार्थ्यांना लवकर मिळाल्यामुळे नक्कीच त्यांचा  प्रवेशाचा मार्ग सुकर होणार आहे.

यावेळी विद्यार्थ्यांना  अभियांत्रिकी महाविद्यालयामधील रेडिओ स्टेशन, ड्रोन सेंटर, एप्पल लॅब याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. ड्रोन विषयी प्रा. विजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तर एप्पल लॅब विषयी प्रा.एस व्ही टेकाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्कूल कनेक्ट कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा.एस.जी. शिंदे, प्रा. पी. एस तांबारे, प्रा.बी. एस. चव्हाण, प्रा. एम. व्ही. जोशी, प्रा.बी. जी. कदम, आर. एल. मुंढे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी ग्रीनलँड स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ.लक्ष्मी स्वामी तसेच बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ लोणेरेचे कुलगुरू यांनीही या कार्यक्रमाबद्दल विशेष कौतुक करून कार्यक्रम उत्कृष्ट घेतल्याबद्दल  अभियांत्रिकी महाविद्यालय आणि टीमचे कौतुक केले.


 
Top