धाराशिव (प्रतिनिधी) - देशात इंडी नावाची एक आघाडी तयार झाली आहे. त्याच्यामध्ये केवळ नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नये, म्हणून काम करत आहे. भाजप देशभरामध्ये सर्व जागा लढवत आहे. तर विरोधात असलेले काँग्रेस संपूर्ण भारतात केवळ 240 जागा लढवत आहे. भाजपमध्ये आज अबकी बार 400 पार तर काँग्रेस म्हणत आहे, आपकी बार जमलं तर पचास के पार. पण जनतेने ठरवले तर अब की बार 400 पार आणि विरोधक बाउंड्री पार होवू शकेल, असा आशावादही धनंजय मुंडे यांनी तुळजापूरमध्ये व्यक्त केला.

धाराशिव लोकसभा मतदार संघातील माहायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी रात्री तुळजापूर शहरात पार पडलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपा नेते सुनील चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विशाल रोचकरी, गोकुळ शिंदे, अमर कदम-परमेश्वर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत दिले होते आणि त्याच्यानंतर जे काही झाले ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. महाराष्ट्राचे सर्वात मोठ नुकसान त्यामुळे झाले. गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात ठाकरे सरकार होते. त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये आई तुळजाभवानीचा उल्लेख असतो. मात्र जेंव्हा तुळजापूरच्या विकास प्रस्तावाची गोष्ट आली. तेंव्हा राज्य सरकारकडून कोणतीही पाऊल उचलण्यात आले नाही. याउलट महायुतीच्या सरकार आल्यानंतर एका वर्षाच्या आत तुळजापूरला विकास निधी देण्यात आला. याचा आशीर्वाद आई तुळजाभवानी अर्चनाताई पाटील यांना दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास देखील धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.


 
Top