धाराशिव (प्रतिनिधी) -18 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 3 ऱ्या टप्प्यात 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. 16 मार्चपासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता  लागू झाली आहे.आचारसंहितेचे उल्लंघन  होणार नाही यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.निवडणूक काळात पथके गठीत करण्यात आली आहे.आतापासूनच सर्व तपासणी नाक्यांवर पथकांनी सज्ज राहून वाहनांची काटेकोरपणे तपासणी करावी.असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतांना डॉ.ओम्बासे बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक गौहर हसन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, उपजिल्हाधिकारी श्रीमती गायकवाड, कळंब उपविभागीय अधिकारी पाटील, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरूषोत्तम रुकमे, तहसिलदार प्रविण पांडे, नायब तहसिलदार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,तहसिलदार व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक या बैठकीत सहभागी होते.

डॉ. ओम्बासे म्हणाले, निवडणूक काळात अवैध मार्गाने दारूची व पैशाची वाहतूक होणार नाही याची सर्व पथकांनी दक्षता घेवून चोखपणे काम करावे.जिल्हयातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा महामार्ग, तसेच आंतरराज्य सीमेवर विशेष लक्ष ठेवण्यात यावे.राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी तपासणी पथके वाढविण्यात यावी.सर्व पथकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध  करून  दयाव्यात.सर्व पथकांनी आपली माहिती वेळोवेळी जिल्हा निवडणूक विभागास उपलब्ध करून दयावी.ज्या खाजगी भिंतीवर राजकीय पक्षांचे चिन्ह लावण्यात आले आहे. त्या घरमालकांचे संमतीपत्र त्यांच्याकडून भरून घ्यावे. निवडणूकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदार जागृती कार्यक्रम व्यापक प्रमाणात आयोजित करावे व प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकडे विशेष लक्ष दयावे असे त्यांनी यावेळी सांगितले.


 
Top